जामनेर, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे ४०० खासदार निवडून आणण्याची तयारी होती. कारण यांच्या मनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचे पाप होते. राज्यघटनेमध्ये हस्तक्षेप करण्याचा डाव पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा होता. पण महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा तुम्ही निवडून दिल्यामुळे घटनादुरुस्ती करण्याचे पाप मोदींना करता आले नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. जामनेर येथे ते (Sharad Pawar) जाहीर सभेत बोलत होते.
पवार (Sharad Pawar) पुढे म्हणाले की, पाच वर्षांमध्ये माझे केवळ पाच खासदार होते. यावेळेस तुम्ही माझे ९ खासदार निवडून दिले. महाय़ुतीने सत्तेचा उपयोग जनतेसाठी केला नाही, तर सत्तेचा दुरुपयोग केला. जळगावच्या रामदेववाडी अपघातात श्रीमंत घराण्यातील तरुणांनी गाडी जोरात चालवली. यात बंजारा समाजाच्या चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात कारवाई झाली नाही. आणि ही कुणामुळे झाली नाही, हे सांगण्याची मला गरज नाही.
टेक्स्टाईल पार्क चार वर्षात झाला नाही. कापसाला भाव मिळाला नाही. सरकार तुमच्या हातात असताना टेक्स्टाईल पार्क करू, अशी घोषणा तुम्ही केली. मात्र तो केला नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी 7000 रुपये भाव द्यावा, म्हणून आंदोलन केले. मात्र, आता किती भाव दिला. कापसाच्या भावासाठी एक शब्द सुद्धा आंदोलन करणारे तुमच्या तालुक्याचे मंत्री आता बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली.
महा विकास आघाडीचे सरकार असताना दहा हजार रुपये किमान भाव होता. मात्र, आता भाव खाली पडले आहेत. खानदेशात कापूस पिकत असताना या लोकांनी बाहेर परदेशातून कापूस आणण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सरकार मधील येथील नेत्यांनी केला आहे.
जामनेरमध्ये अजून एक सुद्धा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यांच्यासाठी जी जमीन घेतली होती. त्याची किंमत सुद्धा मिळालेली नाही. आणि आता सांगताहेत की, पुढचे पाच वर्ष आमच्या हातात सत्ता द्या. त्यांना लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. लोकसभेत आम्ही निलेश लंके याला संधी दिली. त्याच्या घरी मी गेलो, तर दहा बाय दहाचं घर होते. लंके हा साधा माणूस आहे. त्याला लोकांनी डोक्यावर घेतले.आज देशाच्या लोकसभेत तो गेला आणि आमच्या शेजारी बसत आहे. असे पवार यांनी सांगितले.