

सातारा : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 11 जणांनी विधानसभेच्या रणांगणातून माघार घेतली असून आता या आखाडयात आठ जण उरले आहेत. असे असले तरी या मतदारसंघात महायुतीचे आ. शिवेंद्रराजे भोसले व शिवसेना ठाकरे गटाचे अमित कदम यांच्यातच सामना रंगणार आहे. सातारा मतदारसंघातील या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात छाननी प्रक्रियेनंतर 19 उमेदवारांचे 27 अर्ज वैध ठरले होते. मागील आठवड्यात एका उमेदवाराने माघार घेतल्याने 18 जणांचे अर्ज शिल्लक होते. त्यानंतर माघार प्रक्रियेच्या अंतिम दिवशी सोमवारी 10 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये राजेंद्र कांबळे, प्रशांत तरडे, अविनाश कुलकर्णी, वसंतराव मानकुमरे, हणमंत तुपे, सागर भिसे, दादासाहेब ओव्हाळ, विवेकानंद बाबर, सखाराम पार्टे, सोमनाथ धोत्रे यांचा समावेश आहे. या माघारीमुळे सातारा विधानसभेच्या आखाड्यात आता 8 उमेदवार आहेत. त्यामध्ये महायुतीचे आ. शिवेंद्रराजे भोसले, मविआचे अमित कदम, बसपाचे मिलींद कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे बबन करडे, रासपचे शिवाजी माने तसेच अपक्षांमध्ये डॉ. अभिजीत आवाडे-बिचुकले, गणेश जगताप, कृष्णा पाटील यांचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ही लढत लक्षवेधक होणार असल्याचे दिसत आहे.
आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजप-महायुतीत आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यांना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची साथ मिळाल्यामुळे ताकद वाढली असून मतदारसंघातील वातावरण पालटले आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आखलेले सर्वच राजकीय डावपेच यशस्वी ठरल्यामुळे मतदारसंघात भाजप-महायुतीची हवा निर्माण झाली आहे. त्यांनी मतदारसंघात जोरदार रान उठवले असून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच प्रचाराचे रान तापवले आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत त्यांचा धुमधडाका सुरू असून प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. अमित कदम यांनीही मतदारसंघात जोरदार रणशिंग फुंकत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी त्यांची भिरकीट सुरू आहे. ते कशी लढत देतात हे पहावे लागणार आहे.