

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवर मंगळवारी (दि.१९) रात्री तीन दुचाकीवर आलेल्या सहा अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. ही घटना रात्री सव्वा दहाच्या सुमारास गोलवडी लिंक रोडवर घडली. या हल्ल्यात गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, सिद्धांत शिरसाट यांचा मित्र किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
सिद्धांत शिरसाट हे त्यांचा मित्र आणि वाहनचालकासोबत गोलवडी भागातून शहराकडे जात होते. त्याच वेळी तीन दुचाकींवर आलेल्या सहा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गाडीच्या समोरील काचेला नुकसान झाले. दगडफेकीत सिद्धांत शिरसाट यांचा मित्र किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांचे उद्दिष्ट काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
मतदार संघातून घराकडे मित्रासोबत माझ्या वाहनातून मी निघालो होतो. गोलवाडी लिंक रोडवर रात्री सव्वा दहाच्या सुमारास आमच्या वाहनाच्या मागे सहा दुचाकी आणि दोन कार आल्या. त्यातील त्यांनी अगोदर अडवून मला कुठे चालले अशी विचारणा केली. त्यानंतर काही कळण्याच्या आत पुन्हा परत येऊन दुचाकीवरील सहा जणांनी दगडफेक सुरू केली. यात माझ्या मित्राला किरकोळ दुखापत झाली आहे.
पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, अशी मागणी आ. संजय शिरसाट यांनी केली आहे. "हा हल्ला पूर्वनियोजित आहे की नाही, याचा तपास होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी सतर्क राहिले पाहिजे," असे ते म्हणाले.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस आणि मी स्वतः तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आहोत. सिद्धांत शिरसाट यांचा मित्राला पाठीवर दगड लागल्याने किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना घेऊन आम्ही पोलिस ठाण्यात जात असून तक्रारीवरून गुन्हा दाखल करू. हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. लवकर त्यांना पकडण्यात येईल, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत यांनी पुढारीशी बोलताना दिली.