

नाशिक : मध्य विधानसभा मतदारसंघात सुमारे २४ हजार नावे बोगस असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार वसंत गिते यांनी केल्यानंतर या मतदारसंघातील भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पलटवार केला आहे. २०१९ च्या मतदारयादीतील १८ हजार नावे वगळण्यात आली, तर २० हजार नावे दुबार असल्याचा दावा आ. फरांदे यांनी केला आहे. मतदारयादीचे पुनर्परीक्षण करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केली आहे.
दोन दिवसांपूर्वी गिते यांनी मतदारयाद्यांबाबत आक्षेप घेत फरांदे यांच्यावर आरोप केला होता. शुक्रवारी (दि. १८) फरांदे यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांची भेट घेत मतदारयादीतील गोंधळाबाबत चर्चा केली. तसेच काही पुरावेही सादर केले. यावेळी आ. फरांदे म्हणाल्या की, ५ जून २०२४ रोजी मी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले होते. मध्य मतदारसंघात २० हजार ९९६ दुबार नावे आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदारयादीत ही नावे कायम होती. मात्र आठ महिने उलटूनही याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच १८ हजार नावे अशी आहेत की, त्यांचा समावेश २०१९ च्या मतदारयादीत होता; परंतू कोणतीही नोटीस किंवा प्रक्रिया न करता ही नावे मतदारयादीतून वगळण्यात आली. मतदारांना अशा प्रकारे वंचित ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत ८ जून २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे मालेगाव मध्य मतदारसंघातील ७०० नावे नाशिक मध्य मतदारसंघात जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे मतदारयादीतील या अनागोंदीबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून मतदारयादीचे पुनर्परीक्षण करावे, अशी मागणी फरांदे यांनी केली आहे.
वसंत गिते हे नाशिक मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाकडून इच्छूक आहेत. गिते यांच्या आरोपांनंतर फरांदे यांनी प्रत्युत्तर देताना, निवडणुकीला कलाटणी देण्यासाठी मतदारयाद्यांबाबत आरोप केला जात असल्याची टीका केली. त्यावर, गिते हे पाच वर्षे आमदार होते. त्यानंतर मी सलग १० वर्षे आमदार आहे. गिते यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची तुलना करून त्यावर बोलावे. पाच वर्षांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडावा, असे आव्हान फरांदे यांनी दिले.