

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे बंडखोरीच्या तयारीत असलेले राजेश लाटकर यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत मंगळवारी रात्री घेण्यात आला. काँग्रेस कमिटीमध्ये खासदार शाहू महाराज यांनी हा निर्णय जाहीर केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, त्यांना पक्षांतर्गत विरोध झाल्यामुळे 48 तासांत त्यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राजेश लाटकर यांनी बंडाची तयारी सुरू केली होती. लाटकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. काँग्रेसच्या वतीने मधुरिमाराजे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. माघारीच्या दिवशी शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अचानक माघार घेतल्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवारच राहिला नाही. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मंगळवारी सकाळी ‘अजिंक्यतारा’ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सर्वांनी आपापली मते व्यक्त केल्यानंतर आ. सतेज पाटील यांनी, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अचानक माघार घेतल्यामुळे आपल्याला उमेदवार पुरस्कृत करावा लागणार आहे. त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी सायंकाळी सहा वाजता पुन्हा बैठक घेऊ, असे सांगितले. त्यानुसार सायंकाळी ‘अजिंक्यतारा’ येथे बैठक झाली. या बैठकीत राजेश लाटकर यांना पुरस्कृत करण्याचे ठरविले. त्यानंतर काँग्रेस कमिटीमध्ये खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली. यावेळी शाहू महाराज यांनी राजेश लाटकर यांना ‘मविआ’पुरस्कृत उमेदवार म्हणून मान्यता मिळावी, असा प्रस्ताव मांडला. त्याला शिवसेनेचे विजय देवणे यांनी अनुमोदन दिले. त्याला सर्वांनी मंजुरी दिली. यावेळी बोलताना शाहू महाराज यांनी, जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागा निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, तसेच राजेश लाटकर यांच्या पाठीशी आपण सर्वजण राहूया, असे सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटकपक्षांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांची ‘अजिंक्यतारा’ कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतही सर्व घटकपक्षांनी सोबत राहण्याचे ठरविले आहे. उमेदवार राजेश लाटकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
बैठकीला आ. जयंत आसगावकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, शेकापचे प्रा. टी. एस. पाटील, भाकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. सतीशचंद्र कांबळे, कॉ. दिलीप पोवार, व्यंकाप्पा भोसले, शिवाजीराव परुळेकर, माकपचे चंद्रकांत यादव, डॉ. सुभाष जाधव, शारंगधर देशमुख, मधुकर पाटील, डी. जी. भास्कर आदी उपस्थित होते.