पुढारी ऑनलाईन डेस्कः कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर. यांना शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी आज (दि. २७ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. भाजपचे सत्यजित कदम व क्षीरसागर यांच्यात या मतदारसंघातील उमेदवारीवरुन जोरदार रस्सीखेच सुरु होती. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आता ही जागा राजेश क्षीरसागर यांना फायनल झाली आहे. आता त्यांची थेट लढत काँग्रेसचे उमेदवार राजेश लाटकर यांच्याशी होईल.
शिवसेना शिंदे गटाने आज आपली दूसरी यादी जाहीर केली यामध्ये २० नावांचा समावेश आहे.या यादीत वरळी, अंधेरी पूर्व, रिसोड, पुरंदर, कुडाळ आदी मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. मिलिंद देवरा (वरळी), मूरजी पटेल (अंधेरी पूर्व), भावना गवळी (रिसोड) कुडाळमधून निलेश राणे यांच्यासह राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांसारख्या प्रमुख नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
कोल्हापूर उत्तर मधील उमेदवारीवरुन महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. सुरवातीपासून क्षीरसागर या जागेसाठी इच्छूक होते तर गेल्यावेळी भाजपकडून पोटनिवडणूक लढवलेले सत्यजित कदम यांनीही या मतदारसंघावर दावा केला होता. तर खासदार धनंजय महाडिक हे आपले पुत्र कृष्णराज महाडिक यांच्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे या उमेदवारीवरुन चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. राजेश क्षीरसागर व सत्यजित कदम हे मुंबईतच ठाण मांडून होते. अखेर काल रात्री (२६ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होऊन तोडगा निघाला. आता याठिकाणी राजेश क्षीरसागर यांची थेट लढत महाविकास आघाडीचे राजेश लाटकर यांच्याशी होईल.