
कोल्हापूर : आपले कोल्हापूर ‘कुस्तीची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूरच्या मातीत कुस्ती कला रुजली आणि अधिक फोफावली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने आपल्याकडील तालीम संस्थांचा विकास व्हावा तसेच यातून सर्वोत्तम मल्ल तयार व्हावेत, यासाठी राजेश क्षीरसागर काम करत आहेत, अशी माहिती ऋतुराज क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शहरातील शाहूकालीन तालीम संस्था व प्रमुख मंडळाच्या भेटीगाठी दरम्यान त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.
राजेश क्षीरसागर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष या नात्याने शहरातील तालीम संस्थांच्या विकासासाठी प्रचंड अर्थसाहाय्य केले. तसेच शहरातील बहुतांश तालीम संस्थांच्या इमारत बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असल्याचे ऋतुराज क्षीरसागर यांनी सांगितले.
व्यायामशाळा आणि तालीम संस्था युवा पिढीला घडविण्याचे काम करतात. युवकांच्या आरोग्यासाठी अशा संस्थांना लाखो रुपयांचे व्यायाम साहित्य पुरवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. याचबरोबर शनिवार पेठ येथील निरंजन मठ तालीम येथे धर्मवीर आनंद दिघे कुस्ती संकुल उभारण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच या कुस्ती संकुलाचे काम सुरू होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर हे फुटबॉल वेडे शहर म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर शहरातील युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘राजेश चषक’ ही भव्यदिव्य अशी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाते. या माध्यमातून शहरातील फुटबॉल संघांना दरवर्षी मदत केली जाते.
तसेच शहरातील गणेशोत्सव दरम्यान मंडळांवर होणार्या दडपशाही विरोधात राजेश क्षीरसागर मंडळांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात. यासाठी तमाम कुस्ती प्रेमी आणि खेळाडूंनी आपल्या हाकेला प्रतिसाद देणारा ‘आपला माणूस’ म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन यावेळी ऋतुराज क्षीरसागर यांनी केले.