
नंदुरबार : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नंदुरबार येथे येणार असून १४ तारखेला सकाळी ११ वाजता छत्रपती हॉस्पिटल जवळच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा निश्चित झाली असल्याची माहिती आज येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नाईक, पक्ष निरीक्षक राजस्थानचे माजी मंत्री रामलाल जाट, मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांनी नंदुरबार येथे सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी त्यांच्या समवेत ,प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी चेनिथल्ला, बाळासाहेब थोरात हे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले. नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि महाविकास आघाडीतर्फे चारही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला उमेदवारी देण्यात आली आहे.