नवी दिल्ली: महाराष्ट्रात मतदानाच्या आदल्यादिवशी 'कॅश फॉर वोट' प्रकरणामुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. त्याचे पडसाद दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाचा संबंध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडला आहे. हे ५ कोटी रुपये कोणाच्या सुरक्षेसाठी आहेत? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला टेम्पोत कोणी पाठवला? असे सवाल राहुल गांधी यांनी केले आहेत.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर विरारमधील एका हॉटेलमध्ये पाच कोटी रुपयांची रोकड लोकांना वाटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर येताच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. त्यांनी एक्सवर पोस्ट करुन या प्रकरणाचा समाचार घेतला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर ताशेरे ओढले आणि त्यांना 'मनी पॉवर' आणि 'मसल पॉवर'ने महाराष्ट्राला 'सुरक्षित' बनवायचे आहे. एकीकडे राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला होत आहे, तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते ५ कोटींच्या रोकडसह रंगेहात पकडले जात आहेत. ही महाराष्ट्राची विचारधारा नाही, जनता उद्या मतदान करून उत्तर देईल, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. कॅगने महाराष्ट्रात सरकारी प्रकल्प ऑडिटवर बंदी घातली आहे. निवडणुकीपूर्वी प्रकल्पाचे ऑडिट का थांबवले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महायुतीचे कोणते घोटाळे समोर येणार होते? महायुतीचे काळे कृत्य कोणी झाकले? महाराष्ट्र निवडणुकीत अमर्याद निधीचा गैरवापर करणाऱ्या भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांकडे पैसा कुठून येतो? असे सवाल त्यांनी केले. नियमानुसार काल सायंकाळी ५ नंतर प्रचार थांबला, तेव्हा विनोद तावडे विरारच्या हॉटेलमध्ये काय करत होते? निवडणूक आयोग आता कारवाई करणार की इतके पुरावे असूनही बघ्याची भूमिका घेणार? असा सवाल त्यांनी केला.