राशिवडे: राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी अटीतटीची, चुरशीची निवडणूक होत आहे. याठिकाणी विजयाची हॅट्ट्रीक होणार की पराभवाची? याकडे मतदारसंघाच्या नजरा लागल्या आहेत. महायुतीचे उमेदवार प्रकाश आबीटकर यांनी २०१४ व २०१९ मध्ये सलग दोनवेळा महाविकास आघाडीचे के.पी.पाटील यांचा पराभव केला होता. तर अपक्ष उमेदवार ए.वाय.पाटील यांच्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.
राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पहाता २००४ व २००९ मध्ये के.पी.पाटील हे अपक्ष व राष्ट्रवादीतून निवडून आले. परंतु २०१४ मध्ये के. पी. पाटील यांच्या विजयाची हॅटट्रीक त्यांचेच शिष्य प्रकाश आबीटकर यांनी रोखली. आबीटकर यांनी शिवसेनेची उमेदवारी घेत राष्ट्रवादीच्या के. पी. पाटील यांचा तब्बल ३९ हजार ४०८ मतांनी पराभव केला. तर २०१९ मध्ये पुन्हा शिवसेनेतून उमेदवारी घेत आबीटकर यांनी के.पी.पाटील यांचा १८ हजार ४३० मतांनी पराभव केला.
या दोन्ही निवडणुकीवेळी आबीटकर यांच्या पाठीशी काँग्रेसची छुपी ताकद राहिली होती. २०२४ मध्ये मात्र सुरुवातीपासून के.पी. पाटील यांना उमेदवारीसाठी धावपळ करावी लागली. के. पी. यांना शिवबंधन बांधून ठाकरे शिवसेनेची उमेदवारी घ्यावी लागली. तर शिवसेना (शिंदे गट) मधून प्रकाशराव आबीटकर यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी दीड महिना आधीच प्रचार सुरु केला होता. तर के.पी. यांना नेहमीच राजकीय आधार ठरलेले जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी मात्र महाविकास आघाडीतून उमेदवारीची मागणी केली होती.
परंतु, या आघाडीतून के.पी.पाटील यांना उमेदवारी दिल्याने ए.वाय. यांनी अपक्ष निवडणूक लढवित धक्का दिला. त्यामुळे याठिकाणी विजयाची की पराभवाची हॅटट्रिक होणार? याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रामुख्याने के.पी.पाटील हे २००४ व २००९ मध्ये सलग दोनवेळा निवडून आले होते. आणखी २०१४ला आमदार प्रकाशराव आबीटकर यांनी के.पी.ची विजयी हॅट्रिक रोखली होती. त्यामुळे २०१४ व २०१९ मध्ये सलग दोनवेळा निवडून येणाऱ्या आबीटकरांची हॅट्रीक के.पी.रोखणार काय? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.