वडूज/औंध : ज्यांनी कोव्हिड काळात मढ्यावरच्या टाळूचं लोणी खाल्लं त्या नेतृत्वाला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नसून हा विषय विधानसभेतही गाजला होता. अशा नेतृत्वाला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच योग्य वेळ आहे, अशा शब्दात खा. अमोल कोल्हे यांनी आ. जयकुमार गोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, 84 वर्षांच्या योद्ध्याच्या संघर्षाला साथ देण्यासाठी प्रभाकर घार्गे यांना आमदार करा, असे आवाहनही त्यांनी केले.
सिद्धेश्वर किरोली येथे माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, सुनील माने, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, रणजित देशमुख, धनाजी फडतरे, अनिल पवार, डॉ. महेश गुरव, सुर्यभान जाधव, तानाजी देशमुख उपस्थित होते.
खटाव तालुक्यातील कटगुण गावचे सुपुत्र महात्मा फुले यांनी शेतकर्यांचा आसूड लिहीला. तो आसूड राज्यातील भाजपा महायुतीच्या पाठीवर ओढण्याची हिच योग्य वेळ आहे, असेे सांगून खा. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, राज्यातील साडे पाच हजार कोटींचा रोजगार या सरकारने हिरावून घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार, खासदार विकत घेणार्या भाजपाच्या प्रवृत्तीला गाडून टाकण्याची हिच वेळ असून माण मतदार संघातील जनतेने महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी मविआच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन खा. कोल्हे यांनी केले.
प्रभाकर घार्गे म्हणाले, मागील 10 वर्षांत केंद्रात भाजपा सरकार आहे. त्यांच्या नोटबंदी व अन्य चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता, शेतकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील खोके सरकारने कांद्यासह शेती पिकांना योग्य दर दिला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांची उन्नती साधण्याचा प्रयत्न केला आहे. शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, उद्योगधंद्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. विद्यमान आमदारांनी मागील 15 वर्षांत एकही भरीव काम न करता मतदारसंघाला मागे ढकलण्याचे काम केले आहे. दहशत व दडपशाही उखडून टाकण्याचे काम या भागातील जनतेने करावे, असे आवाहन प्रभाकर घार्गे यांनी केले.