

वर्धा : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये स्वीप अंतर्गत विविध जाणीव जागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत. सदर उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना निष्पक्षपातीपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीचा संदेश देणाऱ्या विविध शिक्क्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
याच उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय स्वीप कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचे संदेश देणारे विविध शिक्के तयार करण्यात आले आहेत. सदर शिक्के हे वर्धा जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील विविध डॉक्टर, कापड दुकानदार, पेट्रोल पंप, हार्डवेअरची दुकाने, मेडिकल स्टोअर, मॉल, किराणा दुकाने इत्यादींना दिले जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातुन दिले जाणाऱ्या बिलांवर सदर मतदार जाणीव जागृती करणारे शिक्के मारण्याचे आवाहन त्यांना करण्यात येणार आहे.
उपक्रमाच्या माध्यमातून विविध प्रकारचे 300 शिक्के बनविण्यात आले आहेत. या शिक्क्यांच्या माध्यमातून दररोज किमान 30 हजार मतदारांपर्यंत सदर मतदार जाणीव जागृतीचा संदेश पोहोचणार आहे. तसेच मतदानाच्या दिवसापर्यंत लाखो मतदारांपर्यंत सदर उपक्रमाच्या माध्यमातून जाणीव जागृतीचे संदेश पोहोचतील. सदर उपक्रमामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन स्वीप टीमच्या वतीने करण्यात आले आहे.