

नाशिक : सर्व राजकीय पक्षांचे अथवा अपक्ष उमदेवार, त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना परवानगीशिवाय निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणार्या वाहनांवर प्रचार फलक लावणे, झेंडे लावणे इत्यादी बाबींवर निवडणूक प्रक्रिया (25 नोव्हेंबर 2024) पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशान्वये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून दोन फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूने तो लावण्यात येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमदेवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांनी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग करणार्या व्यक्तीवर भारतीय न्यायसंहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकार्यांनी आदेशित केले आहे.
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तिगत जागा, इमारत, आवार, भिंत आदी संबंधित जागामालकांच्या पूर्वपरवानगी शिवाय व संबंधित परवाना देणार्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हा दंडाधिकारी जलज शर्मा यांनी निर्बंध घातले आहेत.