
नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी जवळपास ३ दिवस महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर असणार आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभेसह वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही प्रचार सुरू आहे. प्रियंका गांधी वायनाडमध्ये उमेदवार आहेत. १३ नोव्हेंबरला वायनाडमध्ये मतदान होत आहे. या मतदानांतर प्रियंका गांधी महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर असतील. १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान, प्रियंका गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर असून जवळपास ६-७ सभा त्या घेण्याची शक्यता आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाड्यात सभा होणार असल्याचे जवळ जवळ निश्चित आहे.
काँग्रेससह सर्वच पक्षांसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे प्रमुख नेते महाराष्ट्रात येत आहेत. भाजप आणि महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेते येत आहेत. तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सूक्खु, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आदी नेते येत आहेत. या पार्श्वभूमीवर वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आटोपून प्रियंका गांधी महाराष्ट्रात येणार आहेत.