पुढारी ऑनलाईन डेस्क : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुतीचे सरकारने पाच हजार रुपयांची स्वतंत्र मदत दिली. आता सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली. या आश्वासनामुळे संकटात सापडलेल्या विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे उत्पादन अधिक होते. विदर्भातील ता वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. श्चिम विदर्भात ७१ अब्ज रुपयांहून अधिकचे सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे आकडेवारी सांगते. या शेतकऱ्यांना आधार म्हणून महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील, अशी हमी दिली आहे. आता सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिल्याने सोयाबीन उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मुळात दिवाळी आणि नंतरच्या दिवसांतील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था साधारणत: सोयाबीनच्या उलाढालीवर होत असते. नेमक्या याच पिकासाठी दिलासादायी घोषणा होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजना आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा केल्याने बाजारातही नवचैतन्य आले आहे. दिवाळीच्या दिवसांतच हे घडल्याने शेतकऱ्यांसोबतच व्यापारीही या घोषणांच्या अनुषंगाने नियोजन करू लागला आहे. सरकारी दरासोबतच खुल्या बाजारातही सोयाबीनला अधिक दर मिळण्याची चिन्हे आहेत, असे सूत्रांनी सांगितले.