

मुंबई : देशातील ओबीसी समाजासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जोपर्यंत जागरूक नव्हत्या, तोपर्यंत देशात काँग्रेसच्या पूर्ण बहुमताचे सरकार बनायचे. जेव्हा या समाजात जागृती निर्माण झाली, त्यांची एकजूट होऊ लागली तेव्हापासून काँग्रेस कमजोर होत गेल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.
जनतेचा पाठिंबा मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेसने जाती, उपजाती आणि भाषेच्या आधारावर विभाजनाचा डाव आखला आहे. त्यामुळे समाजात एकतेची जाणीव कायम ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी 'एक हैं तो सेफ हैं'चा मंत्र असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. 'माझे बूथ, मजबूत बूथ' या संकल्पनेवर बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसने जातीपातींमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग चालविल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला. महाराष्ट्राच्या भूमीत समाजासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले. मराठी माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतो. त्याला एकतेचे महत्त्व विशेषत्वाने माहीत आहे. त्यामुळेच 'एक हैं, तो सेफ हैं' ही संकल्पना मांडताच मराठीजनांनी त्याचे स्वागत केले. कारण एकतेची गरज त्यांना पूर्वीपासून माहीत होती. महाविकास आघाडी जातीपातीत भांडणे लावत असल्याने हा एकतेचा नारा लोकांनी स्वीकारला आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकांसाठी आता काही दिवस नव्हे तर अवघे काही तास उरले आहेत. या तासांचा ताळेबंद मांडत कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारांपर्यंत पोहोचावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.
कार्यकर्त्यांनी घरोघरी जात भाजप आणि महायुतीचे व्हिजन लोकांसमोर नम्रपणे मांडावे. वादविवाद घालत बसण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधा. निवडणुकांतील महत्त्वाचे मुद्दे त्यांना परत सांगा. भाजपचा प्रत्येक मतदार हा मतदान केंद्रापर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. बूथ व्यवस्थापन हीच निवडणुकीतील विजयाची खरी रणनीती आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान