

म्हसवड : उत्तर माणच्या 32 गावांना पाणी दिल्याशिवाय मी विधानसभेचा अर्ज भरणार नाही. हा शब्द न पाळणार्या आ. जयकुमार गोरेंनी आता कलेढोण-वरकुटेतील शेतकर्यांची फसवणूक सुरु केली आहे. आपल्या दिवडी, म्हसवड व बिदालच्या कार्यकर्त्यांना दहशत दाखवून मारहाण केली. खटाव-माणची जनता या दहशतीला कंटाळली आहे. धुळदेव, हिंगणी, मासाळवाडीतील शेतकरी लोकप्रतिनिधींच्या अन्यायाला कंटाळला आहे. त्याचा प्रत्यय काल दहिवडीतील जनसागरावरुन दिसून आला आहे. सत्तेचा ताम्रपट कोणी घेवून आले नसून दहशतीचे राजकारण जनताच मोडीत काढेल, असा इशारा माण-खटाव विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी दिला.
माण तालुक्यातील मार्डी गटातील विविध गावातील प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनोज पोळ, अनिल पवार, सुभाष नरळे, श्रीराम पाटील, कासलिंग पाटील, दादा शिंगाडे, ज्ञानदेव कोळेकर, देविदास कोळेकर, दत्ता पाटील, विलास कोळेकर, दादा कोळेकर, धैर्यशील कोळेकर, उत्तम कोळेकर, आप्पा शिंगाडे, अण्णासाहेब शिंगाडे, दादा ढवळे उपस्थित होते.
प्रभाकर घार्गे पुढे म्हणाले, मार्डी जिल्हा परिषद गटातील शेतकर्यांवर लोकप्रनिधी अन्याय करत आहेत. त्यांच्याकडून शेतकर्यांवर खोट्या केसेस व तक्रारी होत आहेत. ज्या लोकांकडून मलिदा मिळत नाही. त्यांना केसेसमध्ये अडकवायचे ही लोकप्रतिनिधींची प्रवृत्ती आहे. धुळदेव, हिंगणी व मासाळवाडी भागातील शेतकर्यांच्या जमिनी एमआयडीसीसाठी घेत असताना शेतकर्यांना विश्वासात न घेता जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. त्यांच्यावर खोट्या केसेस, नोटीसा व तक्रारी दाखल केल्या जात आहेत.
आ. जयकुमार गोरेंनी आचारसंहितेच्या आदल्यादिवशी कलेढोण-वरकुटेत कामाचा शुभांरभ केला. नंतर दुसर्यादिवशी पाईपा गायब केल्या. त्यांच्या या दिशाभूलीला जनता आता भुलणार नाही. निवडणूक शेवटच्या टप्प्यात शांततेत चालली असताना म्हसवड, दिवडी, बिदालच्या कार्यकर्त्यांना मारहाण करुन दहशत निर्माण केली जात आहे. दशहत निर्माण करणार्याचा शेवट होतो. गोरे बंधू उघड एकत्र आल्याने त्यांचे आजवरचे खरे रुप लोकांना कळले आहे. तीनवेळा लोकांना फसवून आमदारकी मिळवली. मात्र आता जनता भुलथापांना बळी पडणार नाही. लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना वेठीस धरुन राजकारण करु नये, असेही घार्गे म्हणाले.
दहिवडीत झालेल्या शरद पवार यांच्या सभेला मोठा जनसागर उपस्थितीत होता. इतिहासातील ही सर्वात मोठी सभा झाली. ज्या सभेत लोकांना इमारतीवर जाऊन सभा ऐकावी लागली. लोकांचा प्रचंड उत्साह हा परिवर्तनाच्या बाजूने आहे. लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना वेठीस धरुन राजकारण करु नये, असे आवाहन प्रभाकर घार्गे यांनी केले.