

धनंजय लांबे, छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Polls | बीड जिल्ह्यातील परळीत राज्यातील प्रतिष्ठेच्या लढतींपैकी एक रंगणार आहे. मुंडे बहीण-भावाच्या लढतींमुळे कायम चर्चेत राहिलेल्या या मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत दोघेही एकत्र आले. धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली, पण त्यांचा पराभव झाला. त्या निवडणुकीत जातीय गणिते जुळविण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बजरंग सोनवणे यांच्या विजयामुळे यश आले. तेच गणित पवार यांनी विधानसभेतही आजमावण्याचे ठरविले आहे.
राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे त्यांच्यावर शरद पवार यांचा राग आहे. म्हणूनच विधानसभेत त्यांनी मराठा मतांचे धृवीकरण व्हावे, अशी बांधणी केली आहे. येथे त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. परळी मतदारसंघावर मराठा आणि ओबीसी मतांचा मोठा प्रभाव आहे. मात्र, 2009 मध्ये मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून कधीही ओबीसी विरुद्ध मराठा असे वातावरण नव्हते. पंकजा मुंडे यांनी 2009 मध्ये काँग्रेसच्या त्रिंबक मुंडे यांचा सुमारे 36 हजार मतांनी, तर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचा सुमारे 25 हजार मतांनी पराभव केला होता. 2019 मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला. म्हणजे आतापर्यंतच्या तिन्ही लढती ओबीसी विरुद्ध ओबीसी अशाच झाल्या होत्या. यावेळी मात्र दोन्ही समाजघटक आमने-सामने उभे राहणार आहेत.
धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ओबीसी समाज आहेच; परंतु तो आजपर्यंत कोणत्याही एका नेत्याच्या पाठीशी राहिला नव्हता. या समाजाने कधी पंकजा मुंडे, तर कधी धनंजय मुंडे यांच्या पारड्यात दान दिले. यावेळच्या निवडणुकीत थेट ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना रंगणार असल्यामुळे ओबीसी मुंडे यांच्या पाठीशी एकवटण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मात्र, दोन्ही समाजांच्या मतांचे प्रमाण तुल्यबळ असल्यामुळे दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांवर दोन्ही उमेदवारांची भिस्त असेल, असे जाणकारांचे मत आहे.
परळीत 2019 मध्ये एकूण मतदारसंख्या तीन लाख 6 हजार 710 होती. त्यापैकी दोन लाख 24 हजार 272 मतदारांनी मतदान केले होते. चाणक्य संस्थेकडून 2011च्या जनगणनेच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या मतदारसंघात अनुसूचित जातीचे 16.23 टक्के आणि मुस्लिम 12.5 टक्के मतदार आहेत. उर्वरित जाती-जमातींची आकडेवारी उपलब्ध नाही. 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण मतदारांचे प्रमाण 77.29 टक्के, तर शहरी मतदार 22.71 टक्के आहेत.
राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत. ते बीड जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती राहिले आहेत. हे पदही त्यांना पंकजा मुंडे यांच्या मदतीने मिळाले, असे सांगितले जाते. परळीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याने महाआघाडीतून शरद पवार यांनी या जागेवर दावा केला. त्यांच्याकडे पक्षातील प्रबळ दावेदार राजाभाऊ फड हे इच्छुक उमेदवार होते; परंतु मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष झाल्यास यश मिळू शकते, असे गणित मांडून पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांना संधी दिली. पवार यांनी ऐनवेळी राजेसाहेब देशमुखांना प्रवेश देऊन उमेदवारीही दिली. देशमुख यांना मनोज जरांगे यांचाही पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे.