पालघर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात आज मतदान होत असून सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. जिल्ह्यात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई असे सहा विधानसभा मतदारसंघ असून एकूण २२ लाख ९२ हजार ६६ मतदार आहेत. यामध्ये ११ लाख ८७ हजार ५८९ पुरुष, तर ११ लाख ४२४६ स्त्रिया आहेत. २३१ तृतीयपंथींचा यामध्ये समावेश आहे. पालघर जिल्ह्यामध्ये २१,४१२ दिव्यांग मतदार असून ३२६ सैनिक मतदार आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये २२ लाख ९२ हजार ६६ मतदारांपैकी २० लाख ५ हजार ८७१ मतदारांपर्यंत मतपत्रिकांचे (स्लीप) वाटप करण्यात आलेले आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत हे वाटप ८७.५१% इतके आहे.
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मतदान प्रक्रियेविषयी विविध माहिती दिली. ज्यावेळी जिल्हाधिकारी बोडके यांच्यासह अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र हजारे, स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी विजया जाधव, उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये २२७८ मतदान केंद्रे असणार आहेत. सर्वाधिक मतदान केंद्रे नालासोपारा मतदारसंघात असून ती संख्या ५०३ इतकी आहे. तर पालघर मतदार संघामध्ये सर्वात कमी मतदान केंद्रांची संख्या ३२४ इतकी आहे. सध्या तापमान वाढ व उन्हाचा चटका बसत असल्याने जिल्ह्यातील १७८३ मतदान केंद्रांवर कापडी मंडप टाकण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा यासह बसण्याची व्यवस्था तसेच काही मतदान केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रतीक्षागृह तयार करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांमध्ये अधिक रांगा असल्यास केंद्राच्या आतमध्ये एका वेळी तीन ते चार मतदारांना सोडण्याची मुभा देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ज्या मतदार महिलांसोबत लहान मुले असतील त्यांना त्या मतदान केंद्राबाहेर पाळणाघरात ठेवण्यात येणार आहे. तर मतदान केंद्रांवर मोबाईलला सक्त बंदी असणार आहे.
जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर मातांसाठी सुविधा मिळण्यासाठी विल चेअर, बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी २२७२ स्वयंसेवक नियुक्त करण्यात आलेले आहेत. एका मतदान केंद्रावर किमान दोन स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. मतदानासाठी देण्यात येणाऱ्या ईव्हीएम व बॅलेट मशीनसाठी जिल्ह्यात राज्य परिवहन मंडळाच्या २७१ वस, ४७१ खाजगी वाहने तर १९२ खाजगी बस व आठ बोट तैनात असणार आहेत. वाढीव, वेती, अर्नाळा, पाणजू अशा बेटांच्या ठिकाणी मतदारांसाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा लावण्यात येणार आहे. मंगळवारी जिल्ह्यातील २२७८ मतदान केंद्रांवर मतदान यंत्र पोहोचवण्यात येणार आहे जिल्ह्याच्या या मतदान केंद्रांसाठी २८४८ बॅलेट युनिट २८४८ कंट्रोल युनिट व ३०७७ व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आलेल्या आहेत.
निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग केलेली एकही तक्रार दाखल नसली तरी पथके व राज्य उत्पादन शुल्क यांच्यामार्फत आत्तापर्यंत रोकड व वस्तू अशा २२ कोटी एक लाख रुपयांचे जप्तीकरण केलेले आहे. यामध्ये १६ कोटी १४ लाखाच्या जवळपास रोकड, दोन कोटी ४६ लाखाच्या जवळपासची मद्य, २७ लाखांच्या जवळपास अमली पदार्थ, ६५ लाखांच्या जवळपासचे साहित्य व वस्तू तर दोन कोटी ४७ लाखाच्या जवळपास भेटवस्तू पथकांनी जप्त केले आहेत.
मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. जिल्ह्यात जवळपास २७८२ पोलीस अधिकारी कर्मचारी २००० जवळपास गृहरक्षक दलाचे जवान तसेच केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या आठ कंपन्या जिल्हाभर नियुक्त करण्यात आल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील १५४५ मतदान केंद्रांचे थेट प्रक्षेपण (वेब कास्टिंग) करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, खाजगी आस्थापना, औद्योगिक वसाहतीमधील कारखाने यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पालघर लगतच्या गुजरात राज्यात असलेल्या व तेथे कामावर जाणाऱ्या पालघरच्या लोकांसाठी ते कारखाने बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. जिल्ह्यात आठवडी बाजार बंद राहणार असून रोजगार हमी योजनांवर काम करणाऱ्या मजुरांना त्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२३ नोव्हेंबर रोजी डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई या मतदारसंघांच्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे. डहाणू येथे मसोलीच्या सेंट मेरीज हायस्कूलमध्ये, विक्रमगड मध्ये आयटीआय जव्हार, पालघरमध्ये तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामात, बोईसर मध्ये टीम हॉल, नालासोपारा मध्ये समर्थ इंटरनॅशनल स्कूल तर वसई मध्ये जी जी कॉलेज येथे मतमोजणी पार पडणार आहे.