

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी(दि.१५) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा हाती घेत मुर्तडक यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. एेन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या पक्षबदलाने महाविकास आघाडीला बळ प्राप्त झाले असून, मनसेला मात्र फटका बसणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शनिवारी (दि.१६) नाशकात दोन सभा होत आहेत. त्यापूर्वीच ठाकरे गटाकडून राज ठाकरेंना मुर्तडक यांच्या रुपाने चेकमेट देण्यात आला आहे. मुर्तडक हे नाशिक पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांच्या ऐवजी प्रसाद सानप या नवख्या उमेदवाराला संधी देण्यात आल्याने मुर्तडक हे नाराज होते. मुर्तडक हे मुळ शिवसैनिक आहेत. ते १९९७ पासून पंचवटीतील प्रभागातून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. मुर्तडक यांनी २०१२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्या टर्मला राज ठाकरे यांनी त्यांना महापौरपदाची संधी दिली होती. पक्षात नवख्यांना अधिक महत्व दिले जात असल्यामुळे ते नाराज होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी (दि.१६) नाशिक पश्चिमचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर येत असतांना, त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला मुर्तडक यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची नोटीस मिळालेले वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाप्रमुख पवन पवार, भाजप नेते विक्रम नागरे यांनी उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेत ठाकरे गटात प्रवेश केला. त्याचप्रमाणे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, भाजपचे माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे, माजी नगरसेविका पल्लवी पाटील, गोविंद वाघ, शामराव निकुंभ, आदींनीही यावेळी ठाकरे गटात प्रवेश केला. यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे बळ वाढले