

इगतपुरी : महायुती व महाविकास आघाडीने इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच उमेदवार दिल्याचा आरोप करत सर्वच इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी बैठकीत घेण्यात आला. वाडीवऱ्हे येथे ही बैठक झाली.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंतर्गत वाद चांगलेच उफाळून येत असून, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात तर महायुती व मविआकडून देण्यात आलेल्या उमेदवार मान्यच नसल्याचा पवित्रा सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत वाडीवऱ्हे येथे बैठक घेत निवडणुकीत सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी अपक्ष अर्ज करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बैठकीत ठरविण्यात आलेली कोअर कमिटी जो उमेदवार मान्य करेल त्याच उमेदवाराने निवडणूक लढवयाची व इतरांनी माघार घेऊन त्याच उमेदवारासाठी काम करण्याचा निर्णय झाला.
बैठकीप्रसंगी माजी आ. शिवराम झोले, माजी आ. काशrनाथ मेंगाळ, पांडुरंग बाबा गांगड, पं. स. माजी सभापती गोपाळ लहांगे, माजी सभापती रवींद्र भोये, डॉ. भारती भोये, अनिता घारे, उषा बेंडकोळी, भाऊसाहेब डगळे या इच्छुकांसह सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीने स्थानिकांना प्राधान्य न देता बाहेरच्या तिकीट दिल्याचा आरोप करत जाहीर उमेदवारांना विरोध दर्शविला. त्यामुळे या मतदारसंघातील सर्वच इच्छुक सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे माजी आ. मेंगाळ, लहांगे, कावजी ठाकरे यांनी सांगितले. बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा समन्वयक निवृत्ती जाधव, रमेश गावित, निवृत्ती जाधव, राजाभाऊ नाठे, सोमनाथ जोशी, कचरू पा. डुकरे, रवींद्र भोये, हिरामण कौटे, रमेश धांडे, हरिश्चंद्र नाठे, साहेबराव धोंगडे, अंबादास धोंगडे, एकनाथ मुर्तडक आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.