नाशिक : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीतर्फे रविवार कारंजावरील चांदीच्या गणपती मंदिरात महाआरती करत साकडे घालण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राज्यात सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम केले. अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, वयोश्री योजनांसारख्या अनेक योजनांचा तळागाळातील जनतेला लाभ झाला.
लाडकी बहिण योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये मिळू लागले. या योजना राज्यात पुढील काळातही सुरू राहाव्यात यासाठी मुख्यमंत्रीपदी पुन्हा शिंदे यांचीच निवड होण्याची गरज आहे. त्यासाठी नाशिकमधील लाडक्या बहिणींनी एकत्र येत चांदीच्या गणपतीला साकडे घातले. महापूजा करून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे यासाठी आरती केली अशी माहिती शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या सुवर्णा मटाले यांनी सांगितले. याप्रसंगी मंगला भास्कर, श्यामला दीक्षित, अस्मिता देशमाने, भारती धात्रक, अनिता पाटील, ज्योती फड, आरती गायखे, मंजुषा पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.