नाशिक : पंधराव्या विधानसभेसाठी बुधवारी (दि. २०) मतदान पार पडताच सर्वच मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स त्या-त्या मतदारसंघांतील गोदामाच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच असून, सशस्त्र पोलिस यंत्रणा तैनात केली आहे. याशिवाय उमेदवारांकडून तीन प्रतिनिधींना स्ट्राँगरूम अंतर्गत येणाऱ्या सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली थांबण्यास परवानगी असल्याने त्यांच्याकडूनही या ठिकाणी पहारा दिला जात आहे.
बंदोबस्ताच्या पहिल्या स्तरात इमारतीच्या आत मतपेट्या असलेल्या खोलीजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांची सुरक्षा. प्रत्येक स्टाँगरूममध्ये एक प्लटून.
दुसऱ्या स्तरात इमारतीच्या आवारात राज्य राखीव दलाची तुकडी.
तिसऱ्या स्तरात इमारतीबाहेर मुख्य प्रवेशद्वारालगत पोलिस ठाण्यांचे अधिकारी, अंमलदार तैनात असतील.
अग्निशमन दलाचा प्रत्येकी एक बंब प्रवेशद्वारावर तैनात राहणार असून, पोलिस ठाणे प्रमुख निरीक्षकासह गुन्हे शाखेच्या पथकांची प्रभावी गस्त.
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील ईव्हीएम मशीन्स सीलबंद करून तसेच व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) मशीन्स त्या-त्या मतदारसंघांतील सरकारी गोदाम तसेच इमारतींमध्ये ठेवण्यात आले आहेत. याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीन्सशी छेडछाड केली जात असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना नियंत्रण कक्षात थांबण्याची परवानगी असल्याने, पोलिसांसह उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील याठिकाणी खडा पहारा देताना दिसून येत आहेत. मतदान पार पडल्यापासून ते मतमाेजणीपर्यंत सुमारे ६० तासांचा अवधी आहे. त्यामुळे इतका काळ प्रतिनिधी याठिकाणी पहारा देणार आहेत. दरम्यान, शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार असल्याने, प्रशासनाकडून त्याबाबतची जय्यत तयारी केली जात आहे.
शनिवारी (दि. २३) सकाळी ८ पासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी स्ट्राँगरूममध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीचे कवच बसविण्यात आले आहे. दुपारी 4.30 पर्यंत जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांचे कौल समोर येण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.