नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५०.३९ टक्के मतदान झाले असून, ६ वाजेपर्यंत त्यात चार ते पाच टक्क्यांची भर पडली जाण्याची शक्यता आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक पश्चिममध्ये ५४.३४ टक्के मतदान झाले होते. यंदाही याच दरम्यान मतदान झाले असून, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.
कामगार बहुल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली गेली. कंपन्या तसेच विविध आस्थापनांना भेटी देवून तेथील कामगारांचे प्रबोधन केले. तसेच उच्चभ्रु आणि झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसाठी देखील विविध उपक्रम राबवून मतदान वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्राप्त आकडेवारीवरून गतवर्षीइतकेच मतदान झाल्याचे दिसून येते. दरम्यान, मतदानासाठी नागरिकांमध्ये चांगला उत्साह बघावयास मिळाला. सकाळी ७ वाजेपासूनच लोक मतदानासाठी घराबाहेर पडले. सकाळी १० वाजेपर्यंत मतदार संघातील बहुतांश बुथवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ९ वाजेपर्यंत मतदार संघात ६.२५ टक्के इतके मतदान झाले होते. तर ११ वाजेपर्यंत १६.३२ टक्क्यांपर्यंत हा आकडा पोहोचला. दुपारी १ वाजता २८.३४ टक्के तर ३ वाजेपर्यंत ४०.५१ टक्के मतदान झाले होते. शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५०.३९ टक्के मतदान झाले. दरम्यान, मतदानाची वेळ सायंकाळी ६ वाजेपर्यंत असल्याने, यात आणखी चार ते पाच टक्क्यांची भर पडू शकते.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात तरुण आणि ज्येष्ठ मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. ज्येष्ठांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरसह पिण्याचे पाणी तसेच थेट मतदानाची संधी आदी उपाययोजना उपलब्ध करून दिल्याने, मतदान करणे सुसह्य झाले. मतदानोत्सवात तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेत इतरांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.