नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांतील एकूण 13 लाख 21 हजार 642 मतदारांपैकी 8 लाख 42 हजार 126 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने सायंकाळी 5 पर्यंत 63.72 टक्के मतदान झाले असून, मतदानाचा आकडा 70 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सकाळी 7 पासून 12 पर्यंत बहुतांश ठिकाणी धिम्या गतीने मतदान होत असल्याचे पाहायला मिळाले. कुठे दुपारी 1, तर कुठे 2 नंतर मतदानाला गर्दी वाढू लागल्याचे दिसून आले. तथापि, पहिल्यापासूनच चारही विधानसभा मतदारसंघांत महिलांची विशेष उपस्थिती जाणवली. अनेक बूथवर लाडक्या बहिणींचा उत्साह दांडगा होता, असा दावा कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, दुर्गम मतदान केंद्रासह सर्व ठिकाणी वेळेत निवडणूक कर्मचारी पोहोचावे आणि मतदानाची व्यवस्था व्हावी यासाठी 126 एसटी बस, 399 जीप, दोन बार्ज, 166 क्रूझर अशी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. 723 मतदान केंद्रांवरून थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली. तथापि 65 केंद्रे असे आहेत की, जिथे नेट अथवा संपर्काच्या तत्सम कोणत्याही सुविधा कक्षेत ते येत नाहीत.
अक्कलकुवा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत 60 टक्के मतदान झाले. येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार माजी मंत्री के. सी. पाडवी यांच्या विरोधात भाजपच्या माजी खासदार डॉ. हीना गावित या अपक्ष निवडणूक लढवत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी, काँग्रेसचे माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी रिंगणात असून, चौरंगी लढत आहे.
शहादा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांची समोरासमोर लढाई रंगली असून, या ठिकाणी सायंकाळी 5 पर्यंत 65 टक्के मतदान झाले यावरून येथे काट्याची लढत रंगल्याचे दिसत आहे.
नवापूर मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सर्वाधिक म्हणजे 74.65 टक्के मतदानाची नोंद झाली. या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष नाईक, अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भरत गावित आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद गावित यांच्यातील तिरंगी लढाई रंगली आहे.