पूर्णा : गंगाखेडमध्ये आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांची दुसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक झाली. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ चा आज निकाल आहे. सकाळी ८ वाजल्यापासून गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयात प्रत्यक्षात निवडणूक विभागाकडून मतमोजणी करण्यात आली. एकूण ३१ मतमोजणी फेरी अखेर रासपा महायुती पुरस्कृत उमेदवार विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे यांना एकूण १४१७५६ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी उबाठाचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांना एकूण ११४२९५ मते मिळाली.
यापैकी विशाल कदम यांच्यापेक्षा आ. डॉ रत्नाकर गुट्टे यांनी २७४६१ मतांची आघाडी घेत दुसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक केली. या निकालाची माहिती मिळताच पूर्णा शहरातील आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ संपर्क कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी आनंदी होत फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी, मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष गणेशराव कदम, विश्वनाथ होळकर, गोविंद ठाकूर, संदीप कदम, साईनाथ बोबडे, देवराव साखरे, श्रीनिवास कदम, विनायक कदम, नलबले, मुंजाजी कदम, सोनू ठाकूर, परमेश्वर डहाळे, प्रसाद डहाळे, नामदेव गायकवाड, शिंदे गट शिवसेनेचे अंकित कदम सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.