नागपूर : विधानसभा निवडणूक निकालाचे काउंटडाऊन अंतिम टप्प्यात असल्याने उत्सुकता अधिकच ताणली जात आहे. विदर्भात 62 पैकी महायुतीला 35 ते 40 च्या आसपास तर महाविकास आघाडीला 18 ते 20 आणि अपक्ष दोन ते तीन जागा मिळतील असा अंदाज वर्तविला जात आहे. यात नागपूर शहर व ग्रामीणमधील 12 विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना महायुतीला 7 तर महाविकास आघाडीला 5 जागांचा अंदाज आहे.
एक्झिट पोलच्या दावे-प्रतिदाव्यांमुळे उमेदवार व समर्थकांची धाकधूक वाढली. मात्र, वाढलेल्या मतांचा कौल कुणाला, गुलाल कुणाचा हे शनिवारीच कळणार आहे. दोन्हीकडे विजयोत्सव साजरा करण्याची उत्सुकता लागली आहे. यंदा राज्यासोबतच नागपूर जिल्ह्यातही मतदानाचा टक्का गेल्या तीन निवडणूकांच्या तुलनेत चांगलाच वाढला. महिलांसोबतच एकंदर ६१.६० टक्के मतदान झाले. भाजपने दोन विद्यमान आमदारांचे तिकीट कापले. काँग्रेसमध्येही अनेक ठिकाणी अनपेक्षित उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. रामटेकमध्ये महाविकास आघाडीमध्येच बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले.
रामटेकची जागा मविआत शिवसेना उद्धव सेनेला गेल्यानंतरही तिथून इच्छुक असलेले काँग्रेस नेते माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविली. यंदा मध्य नागपूरमधून भाजपने विद्यमान आमदारांचे तिकीट कापून त्यांच्याजागी प्रवीण दटके यांना उमेदवारी दिल्याने हलबा बहुल मतदारांचे वर्चस्व असलेल्या मध्य नागपूरातुन हलबांनी रमेश पुणेकर यांच्या रुपाने समाजाचा प्रतिनिधी उभा केला. पूर्वमध्येही महायुतीत-मविआमध्ये बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले. येथे महायुतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या आभा पांडे यांनी तर मविआमध्ये पुरुषोत्तम हजारे यांनी बंडखोरी केली. काटोलातही काँग्रेसकडून याज्ञवल्य जिचकार इच्छुक होते. परंतु ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटल्याने जिचकार यांनी अपक्ष निवडणूक लढविली. उमरेडमध्ये भाजपचे प्रमोद घरडे यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढविली.अनेक ठिकाणी थेट भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी तर कुठे तिरंगी लढतही पहायला मिळाली.
दक्षिण-पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड मानला जातो. यंदा ते विधानसभेसाठी सहाव्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने तेथून पुन्हा एकदा प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिली आहे. कामठी विधानसभेतून यंदा भाजपने विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा संधी दिली. पश्चिममध्ये काँग्रेसचे विद्यमान आ. विकास ठाकरे यांची त्यांच्याच पक्षातील नरेंद्र जिचकार या बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढल्याचे पहायला मिळाले. दक्षिणमध्ये यंदा विद्यमान आ. मोहन मते विरुद्ध काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यात तगडा मुकाबला आहे. जिल्ह्यात रामटेक, काटोल, सावनेर, दक्षिण आणि मध्य नागपूरला काट्याची टक्कर पहायला मिळू शकते.