

विकास कांबळे
विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने प्रचाराच्या शुभारंभासाठी कोल्हापूरची निवड केली. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटिरांना टार्गेट करत प्रचाराची दिशा स्पष्ट केली. त्याचबरोबर प्रमुख पदाधिकार्यांच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांतदेखील उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी वर्चस्व राखणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौर्यानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
कोल्हापुरात मेळाव्यास आणि आदमापूर (ता. भुदरगड) येथे झालेल्या प्रचारसभेस मोठी गर्दी करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्हा हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा; परंतु मधल्या काळात त्याची खूपच पडझड झाली. सन 2014 मध्ये तर काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्यात नव्हता; परंतु आ. सतेज पाटील यांनी काँग्रेसची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर मात्र काँग्रेसला उर्जितावस्था मिळाली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि शिवसेनेला 2 जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाला एकही जागा जिल्ह्यात मिळाली नव्हती. 2019 मधील निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढली होती.
त्यांच्या विरोधात भाजप व शिवसेना एकत्र होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन्ही आमदार अजित पवार यांच्या सोबत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील अवस्था अतिशय नाजूक झाली. यामुळे एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीला उमेदवार आयात करावे लागले आहेत. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे जिल्ह्याच्या राजकारणावरदेखील परिणाम झाला. शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही खासदार व दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे वजन वाढले आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे बलाबल वाढले; मात्र जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे केवळ चार जागा राहिल्या. त्यादेखील सर्व काँग्रेसच्याच आहेत.
उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा महत्त्वाचा मानला जातो. एकाचवेळी मतदान होणार असल्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना एकत्र सभा घेण्यावर मर्यादा आल्या आहेत. ठाकरे यांनी प्रचाराचा शुभारंभ करताना शिवसेनेतील फुटलेल्यांवर निशाणा साधत गद्दारांमुळे आपले सरकार पडले आहे, त्यांना धडा शिकविण्याची हीच वेळ आहे, असे सांगून महायुतीच्या नेत्यांना फटकारले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविकास आघाडी जिल्ह्यावरील आपला दबदबा कायम राखणार काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.