MP Sanjay Raut | दोन जागा सोडू, पण देवळाली लढूच

Shivsena UBT : खासदार संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, उबाठा गट आक्रमक
देवळाली कॅम्प, नाशिक
देवळाली कॅम्प : मुंबईत खासदार संजय राऊत यांची भेट घेणारे उबाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे, केशव पोरजे, प्रकाश मस्के, दीपक गायधनी, बबन धोंगडे आदी. (छाया : सुधाकर गोडसे)
Published on
Updated on

देवळाली कॅम्प : उमेदवार निवडीची अंतिम वेळ जसजशी जवळ येत आहे तस तसे सर्वच मतदारसंघांमध्ये इच्छुकांमध्ये आक्रमकपणा दिसून येत आहे. देवळाली हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला असल्याने हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आम्हीच लढविणार, प्रसंगी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना दोन जागा जास्त देणार, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी देवळालीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे महाविकास आघाडीतील शरद पवार गटात खळबळ उडाली आहे.

महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात देवळालीमध्ये महाविकास आघाडी करून कोण लढणार हा तिढा अद्यापही कायम असताना व भाजपचे इच्छुक तुतारी घेण्याच्या तयारीत असताना शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड निराशा दिसून येत असून, कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ मशालीनेच लढवावा, यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत, 1990 पासून 2019 पर्यंत सातत्याने शिवसेनेचा उमेदवार येथे विजयी होत आलेला आहे. मतदारसंघातील भौगोलिक परिस्थिती व संघटन हेही शिवसेनेला अनुकूल असताना केवळ एका निवडणुकीच्या आधारे हा मतदारसंघ दुसऱ्यांना सोडणे योग्य होणार नाही. त्यातही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे दोन डझन इच्छुकांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली आहे. परंतु या सर्वांना दुर्लक्षित करून ऐनवेळी भाजपच्या उमेदवारांच्या हाती तुतारी देण्याचा प्रयोग केला जाण्याची शक्यता गृहीत धरून शिवसेना उबाठा गटाने उचल खाल्ली आहे.

पक्षाचे उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे हे पूर्वी विधानसभा प्रमुख म्हणून काम करीत असताना पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलेले आहे. यंदादेखील लोकसभेला पक्षाची कामगिरी कौतुकास्पद झाल्याने जुन्या व नव्या दमाच्या शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देवळाली लढवायचीच हा संकल्प केला जात आहे. त्यानुसार काल उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे, केशव पोरजे, प्रकाश मस्के, तालुकाप्रमुख दीपक गायधनी, बबन धोंगडे, साहेबराव चौधरी, गोकुळ मोजाड, काका देशमुख, नितीन गायकवाड, वैभव पाळदे, अनिल जगताप, प्रशांत कोकणे आधी पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

शिवसेनेसाठी हा मतदारसंघ अनुकूल असून, शिवसैनिकांच्या अस्मितेचा बनला आहे .कोणत्याही परिस्थितीत तो आघाडीमध्ये शिवसेना पक्षाकडे घ्या, असे साकडे त्यांनी राऊत यांना घातले असता त्यांनीदेखील देवळाली हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे, येथून मशालच पेटणार त्यासाठी प्रसंगी शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागा आघाडीतील इतर पक्षांना सोडण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news