वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: माझ्या समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही. मी योग्यच करणार आहे. मराठा समाजाने मुलगा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा. शांत राहावे. मी बेईमानी करणार नाही. टेन्शन घ्यायचे नाही, अशा शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा समाजाला आश्वस्त केले. अंतरवाली सराटी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मराठे ६ कोटी आहेत. पण तरीही केवळ पाच-दहा आमदार निवडून आले नसते, तर समाजाने खाली मान घालून जाणे मला सहन झाले नसते. म्हणून आम्ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला नाही. आमचा काही राजकारण हा खानदानी धंदा नाही. आम्ही राजकारणासाठी आलो का? मला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे. हाच आमचा मूळ उद्देश असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला सांगतो कुणाचेही बॉन्ड मी घेणार नाही आणि तुम्ही सुद्धा घेऊ नका. कारण जे निवडून येणार नाहीत, ते सुद्धा बॉन्ड द्यायला लागले आहेत. आपल्याला आपली ताकद वाया जाऊ द्यायची नाही. कारण निवडून येण्याचं गणित आहे, त्या आधारावर मराठा समाजाची मते देवून त्याला निवडून आणायचं आहे. कुणीही लिहून दिलं आणि तो पराभवातच जमा असेल तर आपलाच उमेदवार उभा करायला आपल्याला अडचण काय होती? असा सवाल त्यांनी यावेळी केला.