

दहिवडी : माण विधानसभा मतदारसंघाच्या रणधुमाळीस सुरुवात झाली असून भारतीय जनता पक्षाकडून आ. जयकुमार गोरे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रभाकर घार्गे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दुरंगी लढतीच्या टक्करीमध्ये अन्य काही राजकीय पक्ष व काही अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. 33 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने माण विधानसभेच्या रिंगणात 21 उमेदवार उतरले आहेत.
इच्छुक उमेदवार खटाव तालुक्याचे माजी सभापती संदीप मांडवे, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते अनिल पवार व नंदकुमार मोरे या तिघांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन महविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एकूण 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवार असे एकूण 21 उमेदवार माण विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. माण विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. उमेदवारीसाठी संघर्ष ही झाले. परंतु ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचे नाव फायनल झाल्यानंतर निर्माण झालेली कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यात इच्छुक उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी स्वतःच पुढाकार घेतल्याने कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वजण एकत्र आले. उमेदवारी वरील नाराजीचा सूर लगेच कमी करण्यात प्रभाकर घार्गे यांना यश आले आहे. देशमुखांच्या गतवेळच्या निसटत्या पराभवाची परतफेड करण्यासाठी सर्वजण पुन्हा एकत्र येऊन सज्ज झाले आहेत. राजकारणात नवखे असूनही सर्वच नेत्यांनी त्यांना गतवेळी साथ दिल्याने प्रभाकर देशमुख यांचा निसटता अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी त्यांच्या सोबत ज्येष्ठ नेते प्रभाकर घार्गे, काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, डॉ. दिलीप येळगावकर, अभयसिंह जगताप, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ यांच्यासह माण खटाव मधील दिग्गज नेते बरोबर होते. यावेळी शरद पवार यांनी नवी खेळी असून उमेदवार बदलला असून माणचे प्रभाकर देशमुख यांच्या ऐवजी खटाव तालुक्यातील नेते प्रभाकर घार्गे हे उमेदवार आहेत. मागच्या वेळीची आमचं ठरलंयची टीम यावेळी ही सोबत आहे. परंतु यावेळी डॉ. दिलीप येळगावकर यांनी आ. जयकुमार गोरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आ. जयकुमार गोरे यांना यावेळी मोठी साथ मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ. येळगावकर बरोबर असल्याने खटाव तालुक्यातून भाजपला मोठे लीड मिळाले. त्यामुळे या निवडणुकीत आ. गोरेना ही उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.
आ. जयकुमार गोरे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. निवडणूकीची तयारी त्यांनी आधीच करून ठेवली आहे. मतदार संघात गावोगावी त्यांचा जनसंपर्क आहे. भागात पाणी आणल्यामुळे त्यांच्या विषयाची आपुलकी वाढलेली आहे. गेल्यावेळी शिवसेनेकडून शेखर गोरे यांनी उमेदवारी केली होती. त्यांना 38 हजार मते मिळाली होती. त्यांनी यावेळी उमेदवारी केली नाही. त्यांचा राजकीय निर्णय बदलण्याचा पवित्रा त्यांनी मेळाव्याद्वारे जाहीर केला आहे. सद्यस्थितीला ते महायुतीत येण्याच्या तयारीत आहेत. परंतु त्यांनी अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. त्यांना राजकीय शब्द मिळाला तर 15 वर्षांनंतर प्रथमच गोरे बंधू पुन्हा एकत्र होऊन एका स्टेज वर दिसतील. शेखर गोरे यांचे त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे एक स्वतंत्र आस्तित्व आहे. त्यांना मानणारा वर्ग असल्याने दोघे भाऊ एकत्र झाल्यास जयकुमार गोरे यांना निश्चित फायदा होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
आ. जयकुमार गोरे यांनी पाणी प्रश्न हाताळल्याने जीहे-कठापूर, उरमोडी, टेंभू योजनांचे पाणी माण व खटाव तालुक्यात आले आहे. विविध कामे ही मार्गी लागत आहेत. पाणी आणण्याची किमया भाजप सरकारने केली. पाणी माण नदीत सोडल्याने शेतकर्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. आ. जयकुमार गोरे यांनी दळणवळण, रस्त्यासह विविध विकास कामांचा डोंगर उभारला आहे. त्यातच लाडकी बहीण योजनेचा फायदा आ. गोरे यांना किती होणार हे ही पाहणे गरजेचे आहे. तर त्यांचे विरोधक महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे हे गेली तीस वर्षे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकारात काम करत आहेत. सहा वर्षे विधान परिषदेवर आमदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. खटाव तालुक्यात शेतकर्यांच्या हक्काचा साखर कारखाना काढून घार्गेनी शेतकर्यांना मोठा न्याय दिला आहे. त्याचबरोबर घार्गे यांनी त्यांच्या अनेक उद्योगांमार्फत हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. असे दोन्हीही तुल्यबळ उमेदवार समोरा समोर पाणी प्रश्न आणि औद्योगीकरण अशी लढाई लढत आहेत.