मालेगाव : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान पार पडले. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ झाला. नऊपर्यंत 6.30 टक्के मतदारांचे मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागल्याने सायंकाळी पाचपर्यंत 57.56 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात महिलावर्गाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. 2019 ला 59.5 टक्के मतदान झाले होते.
यावेळी 60 टक्केपेक्षा अधिक मतदान होण्याचा अंदाज आहे. कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बाह्य मतदारसंघातून 17 उमेदवार निवडणुकीला उभे आहेत. महायुती शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे, महाविकास आघाडी शिवसेना उबाठा गटाचे अद्वय हिरे व अपक्ष बंडूकाका बच्छाव यांच्यात चुरशीची लढत होत आहे. बाह्यमधील 352 मतदान केंद्रांवर बुधवारी (दि.20) मतदान प्रक्रिया पार पडली. शहरासह ग्रामीण भागात सकाळी नऊपर्यंत 6.30 टक्के मतदारांनी मतदान झाले. त्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. सकाळाच्या सत्रात कॅम्प भागातील केबीएच विद्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक मतदान केले. तर पुष्पा हिरे महिला महाविद्यालयात अद्वय हिरे व सोयगाव येथील मराठी मुलांच्या शाळेत बंडूकाका बच्छाव यांनी परिवारासह मतदान केले. अनेक गावांतदेखील सकाळच्या सत्रात मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मात्र, दुपारच्या सुमारास मतदानाचा वेग कमी झाला होता. बुधवारी (दि.20) सकाळी 11 पर्यंत 17.37 टक्के तर दुपारी एकपर्यंत 27.76 टक्के मतदान झाले होते. तीननंतर मतदार घराबाहेर निघाल्याने मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या.
तीनपर्यंत 47.21 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदारसंघातील अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने मतदारांना ताटकळत राहावे लागले. मतदान यंत्रात बिघाड होण्याचे किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी 5 पर्यंत तीन लाख 80 हजार 576 मतदारांपैकी दोन लाख 19 हजार 61 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात एक लाख 12 हजार 906 पुरुष, तर एक लाख सहा हजार 155 महिला मतदारांनी मतदान केले. दुपारनंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बाह्यचे सूक्ष्म निरीक्षक राहुलकुमार यांनी दाभाडीसह अनेक मतदान केंद्रांना भेटी देत केंद्राध्यक्ष व कर्मचार्यांशी चर्चा करून मतदानासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेतल्या. पालकमंत्री दादा भुसे, अद्वय हिरे व बंडूकाका बच्छाव यांच्यासह महायुती व महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत मतदारांशी व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. यावेळी एनसीसी कॅडेट्स यांनी स्वयंसवेक म्हणून काम केले. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत नेणे, मतदारांच्या रांगांचे व्यवस्थापनाचे काम त्यांनी केले. त्याचप्रमाणे मतदान केंद्र दाखवणे आदी कामे त्यांनी केली.