

सातारा : सातारा-जावलीकरांनो तुम्हाला घराणेशाही पाहिजे की साध्या घरातला, तुमच्यातला, तुमच्यासाठी कधीही हाकेला ओ देणारा असा अमित पाहिजे, हे तुम्ही सांगायचे आहे. तुम्हाला कोण पाहिजे हे ठरवा आता. मी तुम्हाला वचन देतो की अमितने जनतेला जी काही वचने दिली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो, अशा शब्दात शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी अमित कदम यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
सातारा-जावली विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांच्या प्रचारार्थ सातारा-जावलीत पदयात्रा, कोपरा सभा पार पडल्या. त्यानंतर प्रचाराच्या सांगता निमित्ताने उद्धव ठाकरे जिल्हा दौर्यावर आले असता त्यांनी मतदारांना आवाहन केले. ठाकरे म्हणाले, अमितला सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व म्हणून मी संधी दिली असून या सुसंस्कृत व उमद्या नेतृत्वाला साथ द्यायची की पुन्हा घराणेशाहीच्या सोबत रहायचे हे आता जनतेने ठरवावे. हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात द्या. महाविकास आघाडीची संपूर्ण ताकद अमितच्या पाठीशी राहिल.
अमित कदम म्हणाले, जनतेने माझ्यावर विश्वास दाखवावा. 25 वर्षे झाली. या मतदार संघातील सर्व सत्ता विद्यमान लोकप्रतिनिधींच्या ताब्यात आहे. तरीही 25-25 वर्षे येथील प्रश्न आजही तेच आहेत. हे चित्र बदलायचे असेल तर मला एकदा साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
मेढा येथील प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना अमित कदम यांनी धाक दपटशाही, अडवणूक, पिळवणूक, लुबाडणुकीचे 25 वर्षांचे राजकारण जमिनीत गाडून सातारा - जावळी विधानसभा मतदारसंघातील जनता 20 तारखेला नव्या पर्वाची सुरुवात करेल, असा विश्वास व्यक्त केला. बोंडरवाडीचा प्रश्न का सुटला नाही? महू - हातगेघर धरणाचे काम अपूर्ण का ठेवले गेले? शेतकर्यांना शेतीला पाणी का मिळू दिलेजात नाही? चांगल्या शैक्षणिक सुविधा व आरोग्य सुविधा का निर्माण केल्या जात नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला पाहिजेत.
सभेला माजी आमदार सदाशिव सपकाळ, हनुमंत चवरे, अमित कदम यांच्या मातोश्री व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका आशाताई कदम, नीरज नांगरे, गणेश अहिवळे, सुरेश पार्टे, योगेश गोळे, शंकर सपकाळ, शिंगटे गुरुजी आदी उपस्थित होते. दरम्यान, कुडाळ (ता. जावळी) येथे जाहीर सभेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, दोन बंधू एकत्र आले ही चांगली गोष्ट. मात्र त्यांची ही एकी जनतेसाठी नाही तर अमित कदम यांना पाडण्यासाठी आहे. हे दोन बंधू जसे एकत्र आले तशी इथली जनता एकत्र आली आहे, अमित कदम यांना निवडून आणून विधानसभेत पाठवण्यासाठी. अमित कदम यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे.