

कोरेगाव : सातारा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले पाहिजेत. तुमच्या कामाने समोरच्याचे डिपॉजिट जप्त झाले पाहिजे. महेश शिदेंना जिंकायची व काहींना पडायची सवय आहे. ज्यांना पराभवाची सवय आहे ते जिंकणार नाहीत. महेश शिंदे हे ठेवा असून त्यांना कार्यकर्त्यांनी जपावे, असे आवाहन उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी केले.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. महेश शिंदे यांच्या प्राचारार्थ आयोजित कोरेगाव येथील सभेत ते बोलत होते. यावेळी आ. महेश शिंदे, सुनील खत्री, राजाभाऊ बर्गे, दीपाली बर्गे, राहुल बर्गे, नवनाथ केंजळे, संतोष जाधव,संजय काटकर, राजेंद्र घोरपडे, जयवंत पवार, विजय घोरपडे, प्रभाकर बर्गे, हणमंतराव जगदाळे उपस्थित होते.
ना. उदय सामंत म्हणाले, तुम्ही म्हणता लाडक्या बहिणींना 3 हजार देण्याचे आश्वासन दिले आहे. मग आम्ही योजना सुरू झाल्यानंतर ते कोर्टात का गेले? याचा जाब जनतेने त्यांना विचारावा सरकार आल्यानंतर 1500 ऐवजी 2100 रूपये खात्यात टाकणार आहे. कोकणाप्रमाणे कोरेगावमध्येही उद्योगांचे मोठे प्रकल्प येथे आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महेश शिंदेंवर कृपादृष्टी राहणार आहे.
यावेळी आ. महेश शिंदे म्हणाले, एक महिन्यापासून फेक नॅरेटिव्हचा मारा होत आहे. मतदारसंघात जे कधीच दिसले नाहीत अशा व्यक्ति तीन वेळा पराभूत होवूनसुध्दा पराभवाचा चौकार मारण्यासाठी आमदारकीला उभे आहेत. ज्यांचा मातीशी संबंध नाही, त्यांच्याकडून चिखलफेक केली जात आहे. तुम्ही जे पाप करताय भगवंत तुम्हाला माफ करणार नाही. यामुळेच तुमचा तीन वेळा पराभव झाला आहे. 20 तारखेला जनताच तुम्हाला याचे उत्तर देणार आहे. यांच्या धमक्यांना भीक घालू नका. प्रशासनाने बंदोबस्त नाही केला तर गावागावांत बैठका घेवून याचा बंदोबस्त करा, असेही आ. शिंदे म्हणाले.
महेश शिंदे यांचे बटण हे एक नंबरचे आहे. तुमच्या मनातही महेश शिंदे एक नंबरलाच आहे. नियतीचा हा काय योगायोग आहे. मतदारसंघातील एक नंबरचा माणूस एक नंबरला आहे. तर दोन नंबरचा माणूस दोन नंबरलाच आहे. एक नंबरचे महेशदादा एक नंबरचे मताधिक्य घेतील. महेश शिंदे हे भावनिक व संवेदनशील आमदार आहेत, असेही ना. उदय सामंत म्हणाले.