Maharashtra Assembly Polls | आता उडणार निकालाचा बार!

विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल
Maharashtra Vidhan Sabha election
विधानसभा निवडणुकीचा उद्या निकालFile Photo
Published on: 
Updated on: 

प्रमोद चुंचूवार, मुंबई

राज्यात 2019 च्या तुलनेत जवळपास 4 टक्के अधिक मतदान झाले आहे. 2019 च्या विधानसभेत 61.44 टक्के मतदान झाले तर बुधवारी 65.11 टक्के मतदान झाले आहे. हे मतदान मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही जवळफास 4 टक्क्यांनी जात आहे. लोकसभेत 61.33 टक्के मतदान झाले होते. गेल्या 30 वर्षांच्या इतिहासातील हा सर्वाधिक मत टक्का आहे. यापूर्वी 1995 साली राज्यात 71.7 टक्के मतदान झाले होते. महाराष्ट्र विधानसभेच्या बहुप्रतीक्षेत निवडणुकीसाठीचे मतदान बुधवारी पार पडले. आता सर्वांना प्रतीक्षा आहे, ती शनिवारच्या निकालाची!

मतदानानंतर काही संमिश्र प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत. राज्याचा मतटक्का वाढल्याबद्दल निवडणूक आयोगाचे अभिनंदनही करायला हवे. विशेषतः मुंबईत वाढलेल्या मतटक्क्यांबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे. मुंबईत अलीकडच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान झाले. कुलाबा या कमी मतदानासाठी कुख्यात मतदारसंघातही यावेळेस मतटक्का 4 टक्क्यांनी वाढला. अर्थात तरीही कुलाब्यातच राज्यात सर्वात कमी मतदान झाले. एकीकडे नक्षलवाद, दुर्गम भाग, विकासापासून कोसो दूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मतदार लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवून 73 टक्क्यांहून अधिक मतदान करतात तर दुसरीकडे राज्याची राजधानी असलेले मुंबईतील मतदार गडचिरोलीपेक्षा 20 टक्के कमी मतदान करतात, ही बाब चिंतनीय आहे.

तर्कवितर्कांना उधाण

राज्यात 288 पैकी किती जागांवर कोण विजयी होईल, याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राजकीय नेते व उमेदवार मतदानानंतर आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून, बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांकडून माहिती घेऊन निकालाचे अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत. निकालाच्या सर्व शक्यता गृहित धरून त्यात आपला पक्ष व आपण कुठे असू याबाबत हे नेते व पक्ष रणनीती आखत आहेत. 2019 प्रमाणे नवे राजकीय समीकरणे अस्तित्वात येण्याची शक्यताही चर्चेत आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे नेते संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याने तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात, अशा चर्चांना आता उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाची वेळ संपल्यावर बुधवारी रात्री रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्याने निकालानंतर फडणवीस दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जातील, अशा चर्चांना ऊत आलेला आहे. दोन दिवस सर्वच पक्ष व नेते ‘वेट अँट वॉच’च्या भूमिकेत आहेत.

एक्झिट पोल

बुधवारी मतदानानंतर प्रमुख संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले. यापैकी बहुसंख्य संस्थांनी राज्यात महायुतीचे सरकार येऊ शकते, असा अंदाज वर्तविला आहे. सेफॉलॉजिस्ट विजय कुमार कोहाड हे मात्र एक्झिट पोल विश्वासार्ह असल्याचे मानत नाहीत. एक्झिट पोलसाठी जो एम्परिकल डाटा गोळा केल्याचे सांगितले जाते तो डेटा विश्वासार्ह नसतो. कारण, किती लोकांची (सँपल साईज) मते जाणून घेतली हे या पोल जाहीर करणार्‍या संस्था सांगत नाहीत. सध्याच्या घडीला मतदान केंद्रातून बाहेर आलेल्या लोकांना विचारून हे अंदाज वर्तविले जातात. मात्र, आपले मत गुपित ठेवण्यास प्राधान्य देणारे मतदार सत्य बोलतीलच हे सांगता येत नाही. बिहार, हरियाणा, छत्तीसगड व लोकसभा या प्रत्येक वेळी फसले आहेत, असे कोहाड यांना वाटते. मात्र, राज्यात शेवटच्या तीन तासांत 30 टक्के मतदान झाले. सत्ताधारी भाजप ही निवडणुकीचे सूक्ष्म व्यवस्थापन व मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणण्यात तरबेज आहे. त्यामुळे हे मतदान भाजप आणि महायुतीमुळे अखेरच्या टप्प्यात वाढले असण्याची शक्यता असून, याचा लाभ महायुतीलाच होऊ शकतो, हे मात्र कोहाड मान्य करतात. त्यामुळे एक्झिट पोल खरे ठरतात की नाही, याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news