मिलिंद सजगुरे, नाशिक
जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील मतदारसंघ म्हणून गणल्या जाणार्या नांदगावमध्ये मतदानाच्या दिवशी अपेक्षेनुरूप राडा झाला. सत्ताधारी शिंदेसेना आमदार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यावर चाल करून जात, ‘तुझा मर्डर फिक्स’ अशी धमकी दिल्याने राज्यभर खळबळ माजली. समीर हे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे असून, ते माजी खासदारदेखील आहेत. बाहेरून मतदार आणण्याच्या आमदाराच्या कृतीला विरोध केला म्हणून थेट यमसदनी पाठवण्याच्या धमकीमुळे भविष्यात या मतदारसंघात काय वातावरण राहील, याचीच जनतेमध्ये चर्चा होत आहे.
नांदगावमध्ये शिंदेसेनेचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत. गतवेळी त्यांनी मंत्री भुजबळ यांचे पुत्र पंकज यांना अस्मान दाखवत हा गड जिंकला. तेव्हापासून कांदे-भुजबळ यांच्यात कधी छुपे तर कधी उघड शाब्दिक युद्ध रंगताना उभ्या जिल्ह्याने पाहिले आहे. या निवडणुकीत कांदे पुन्हा रिंगणात उतरल्यावर महायुतीचाच घटक असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असलेल्या समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून चुरस निर्माण केली. त्यासाठी भुजबळ यांनी पक्षाच्या मुंबई क्षेत्रीय अध्यक्षपदावर पाणी सोडले. स्वाभाविकच, हा मतदारसंघ हाय व्होल्टेज लढतीचा राहणार, यावर शिक्कामोर्तब झाले.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच नांदगावमध्ये तणावाचे वातावरण राहिले. भुजबळ यांच्या प्रचारसभेत भाषण केल्यानंतर त्यांच्या समर्थकाला कांदे यांनी भ्रमणध्वनी संभाषणात धमकावले, तर आणखी एका समर्थकाला समोरासमोर धमकी देऊन वातावरण तापवले. बुधवारी मतदानदिनी बाहेरून मतदार आणण्याच्या आमदाराच्या कृतीला भुजबळ यांनी हरकत घेतल्याने दोहोंमध्ये शब्दयुद्ध पेटले. कांदे यांनी तुझा मर्डर फिक्स अशी भुजबळ यांना पोलिसांसमक्ष धमकी दिली. भुजबळ यांनीही तुझ्यासारखे 56 पाहिले... म्हणत आमदारास प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी दोहोंविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी या मतदारसंघातील जनतेच्या पुढ्यात भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याची प्रचिती गेल्या तीन आठवड्यांतील वातावरणाने दिली आहे. कांदे-भुजबळ यांच्यातील द्वंद्व म्हणजे महायुतीत निर्माण झालेली बेदिली असल्याने राज्यस्तरीय नेतृत्व ती कशी निस्तरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.