

अलिबाग : अतुल गुळवणी
रायगडच्या राजकारणाचा ट्रेंड बदलत चाललाय. पुरुषांबरोबरच महिलांनाही राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आमदार, मंत्री म्हणून काम करण्याची संधी रायगडातील महिला नेत्यांना मिळाली आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत रायगडच्या दोन लेकी आणि एक सूनबाई आपले राजकीय भवितव्य अजमाविणार आहेत. यामध्ये नेमके कोण कोण यशस्वी होऊन रायगडचा आवाज म्हणून विधानसभेत काम करणार हे २३ नोव्हेंबरला दिसणार आहे. जर या तिन्ही महिला विजयी झाल्या तर रायगडला एकाचवेळी तीन महिला आमदार लाभतील.
अलिबाग विधानसभा मतदार संघात सन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने मीनाक्षी पाटील यांना प्रथम उमेदवारी दिली. त्यावेळी त्या जि.प.च्या विरोधी पक्षनेत्या होत्या. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मीनाक्षी पाटील या विजयी झाल्या आणि रायगडमधील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर काँग्रेसने सन १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत खोपोलीच्या पुष्पा साबळे यांना उमेदवारी दिली, पण त्यांना पराभव सहन करावा लागला. त्यानंतर मीनाक्षी पाटील वगळता अन्य कुठल्याही पक्षाने महिलेला उमेदवारी दिलीच नाही. मीनाक्षी पाटील यांनी अलिबाग विधानसभा मतदार संघातून १९९५ ते १९९९, १९९९ ते २००४ आणि २००९ ते २०१४ या कार्यकाळात आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. यामध्ये १९९९ ते २००४ या कार्यकालात त्या तत्कालीन विलासराव देशमुख मंत्रिमंडळात राज्यमंत्रीही म्हणूनही कार्यरत होत्या. सन २००४ मध्ये त्यांना काँग्रेसच्या मधू ठाकूर यांनी पराभूत केले. तर याच पराभवाचा बदला मीनाक्षी पाटील यांनी सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत घेत पराभवाची परतफेड केली.
यंदाच्या निवडणुकीत मात्र तीन महिला नेत्या राजकीय भवितव्य अजमावित आहेत. यामध्ये आदिती तटकरे दुसऱ्यांदा तर शेकापच्या चित्रलेखा पाटील आणि ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. या दोन्ही महिला नेत्यांना राजकीय कुटुंबाची भक्कम पार्श्वभूमी आहे. चित्रलेखा पाटील या शेकाप नेते जयंत पाटील, सुप्रिया पाटील यांच्या स्नुषा आहेत. चित्रलेखा पाटील या अलिबाग नगरपालिकेत काहीकाळ स्वीकृत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. याशिवाय पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख म्हणूनही त्या काम पहात आहेत. तशी कुठल्याही प्रकारची सार्वजनिक निवडणूक त्यांनी आतापर्यंत लढविलेली नाही. थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातच त्यांनी उडी मारली आहे.
स्नेहल जगताप या महाडचे दिवंगत आम. माणिकराव जगपात यांच्या कन्या आहेत. त्यांनी महाडच्या नगराध्यक्षपदाची धुरा यापूर्वी सांभाळली आहे. यावेळी त्या ठाकरे शिवसेनेतर्फे उभ्या आहेत. चित्रलेखा पाटील यांची लढत शिवसेना (शिंदे) गटाचे विद्यमान आ. महेंद्र दळवी तर स्नेहल जगताप यांची लढत शिंदे गटाचेच आम, भरत गोगावले यांच्यासमवेत होणार आहे. यामुळे या दोन्ही लढती रायगडसाठी हाय होल्टेज ड्रामासारख्या आहेत हे नक्की. आता या दोन्ही मतदार संघातील मतदार कुणाला आपला आमदार म्हणून निवडतात हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. या दोन मतदार संघाच्या तुलनेत श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे यांची लढत तशी सोपी राहील अशी अपेक्षा आहे.
मीनाक्षी पाटील यांच्यानंतर सन तब्बल १० वर्षानंतर आदिती तटकरे यांच्या रुपाने दुसरी महिला रायगडची आमदार झाली. त्यांचा राजकीय आलेख नेहमीच यशस्वी वाढत राहिला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरुन थेट आमदार होण्याची किमया आदिती तटकरे यांनी साधली. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या श्रीवर्धनमधून विजयी झाल्या. पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदितींनी तत्कालीन मविआ सरकारमध्ये राज्यमंत्री देखील होण्याची संधी लाभली. दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय बदलातही त्या थेट कॅबिनेट मंत्री देखील झाल्या. एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्यातीही झाली आहे.