Maharashtra assembly special session : 'महायुती'च्या आमदारांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ, विरोधकांचा बहिष्कार

विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Maharashtra assembly special session
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतली. (Image source- @MahaDGIPR)
Published on
Updated on

Maharashtra assembly special session Updates

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आज शनिवारपासून विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. दरम्यान, आमदार अबू आझमी आणि बापू पठारे वगळता महाविकास आघाडीतील इतर आमदारांनी आज शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. अबू आझमी हे महाविकास आघाडीसोबत आहेत. तर बापू पठारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. EVMच्या वापराने लोकशाहीची हत्या होत असल्याने आम्ही शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकत असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच विधानसभा परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमचा निषेध म्हणून 'आय लव्ह मारकडवाडी'चे बॅनर झळकावले.

महाविकास आघाडीचा शपथविधीवर बहिष्कार, पण 'या' दोन आमदारांनी घेतली शपथ

दरम्यान, महाविकास आघाडीने आज शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला असताना आज महाविकास आघाडीचे दोन आमदार अबू आझमी आणि बापू पठारे यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. अबू आझमी हे महाविकास आघाडीसोबत आहेत. तर बापू पठारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

विरोधकांचा शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार

"EVMच्या वापराने लोकशाहीची हत्या होत असल्याने आम्ही आज शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जनतेने दिलेला कौल नाही. हा EVM आणि भारतीय निवडणूक आयोगाचा जनादेश आहे..." असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आज आमचे आमदार शपथ घेणार नाहीत- आदित्य ठाकरे

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी, आज आमचे आमदार शपथ घेणार नसल्याचे म्हटले आहे. "आम्ही आज निर्णय घेतला आहे की आमचे (ठाकरे शिवसेना) नवनिर्वाचित आमदार शपथ घेणार नाहीत. जर हा जनतेचा आदेश असता तर लोकांनी आनंद साजरा केला असता, पण लोकांनी आनंद साजरा केला नाही. आम्हाला EVM बद्दल शंका आहे.''

जितेंद्र आव्हाडांनी झळकावले 'आय लव्ह मारकडवाडी'चे बॅनर

विधानसभा परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमचा निषेध म्हणून 'आय लव्ह मारकडवाडी'चे बॅनर झळकावले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ९ डिसेंबरला

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ९ डिसेंबरला होणार आहे. उद्या रविवारी दुपारपर्यंत अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर विधानसभेत दिली.

अन् हेमंत रासने विरोधी बाकांवर जाता जाता राहिले...

भाजपचे कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकांवर जाण्याऐवजी चुकून विरोधी पक्षाच्या बाकांवर जाऊन बसत होते. तितक्यात अजित पवारांनी त्यांना हाताला धरून सत्ताधारी बाकांवर बसवले. यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, आज शपथ घेणार नाहीत

विरोधकांनी विधानसभेच्या पहिल्याच दिवशी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्र घेतला आहे. ते आज विधानसभेत शपथ घेणार नाहीत. यासंदर्भात विरोधकांची बैठक विधानभवनात झाली. यात त्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ

मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस...असे म्हणत महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष अधिवेशनात शपथ घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच दिलिप वळसे पाटी, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, राहुल नार्वेकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे. उदय सामंत, संजय राठोड यांनीही सुरुवातीला आमदारकीची शपथ घेतली.

गिरीश महाजन यांनी संस्कृतमधून शपथ घेतली.

पहिल्यांदा चैनसुख संचेती यांनी शपथ घेतली आहे. दुसऱ्यांदा शपथ जयकुमार रावल यांनी शपथ घेतली. जयकुमार रावल यांनी जय श्री राम म्हणत शपथ घेतली. तिसरी शपथ माणिकराव कोकाटे यांनी घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन २०२४ प्रारंभापूर्वी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच नवनिर्वाचित आमदारांनी अभिवादन केले.

Maharashtra assembly special session
विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नवनिर्वाचित आमदारांनी अभिवादन केले.(Image source- @MahaDGIPR)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news