

मुंबई : लोकसभा निवडणुकीत प्रचंड खर्च आणि गैरव्यवहार यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रडारवर आलेले ८७ मतदारसंघ आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. या मतदारसंघांतील खर्चावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष असणार आहे.
या मतदारसंघांमध्ये सध्या तैनात करण्यात आलेल्या पथकांव्यतिरिक्त आणखी भरारी पथके नेमण्याचे निर्देश संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या पथकांमध्ये राज्याच्या पोलीस विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाचे अधिकारी किंवा कर्मचारी नेमावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
राज्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील ८७ विधानसभा क्षेत्रामध्ये आचारसंहितेच्या काळात जप्त केलेल्या मुद्देमालात रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू मोठ्या प्रमाणात आढळून आल्या होत्या. तसेच उमेदवारांच्या खर्चाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने हे मतदारसंघ संवेद- नशील म्हणून घोषित केले आहेत.