

मुंबई :
निष्ठावंत शिवसैनिकांनो, मला तुमच्याशी बोलायचं आहे...
ही हाक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे असे कुणालाही वाटेल. पण, ही हाक शिवडीची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले ठाकरे गटाचे शिवडी विधानसभा संघटक आणि लालबाग गणेश मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी शुक्रवारी दिली. मात्र, यातून त्यांचे बंडाचे निशाण फडकू शकते याचा अंदाज मातोश्रीला आला आणि साळवींचा मेळावा सुरू होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलावून घेत त्यांची समजूत काढली. (Maharashtra Assembly Polls)
मातोश्रीहून परतलेले साळवी थेट मेळाव्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांकडे पोहोचले. मात्र, त्यांना जे बोलायचे होते ते पूर्णतः बदलले होते. तिकिट न मिळाल्याने मी नक्कीच नाराज आहे, हे मान्य करतानाच पक्ष सोडून मात्र जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. साळवी म्हणाले, सुधीर, तुला नाराज करणार नाही, असा शब्द उध्दव ठाकरेंनी दिला आहे. त्यांच्या शब्दावर माझा विश्वास आहे! मी राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देणारा कार्यकर्ता आहे, असेही ते म्हणाले.
शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) गटाची उमेदवारी विद्यमान आमदार व गट नेते अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज सुधीर साळवी बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात किंवा अपक्ष म्हणूनही लढू शकतात, अशी चर्चा होती. त्यामुळे साळवी यांना मातोश्री येथे बोलावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न उध्दव ठाकरे यांनी केला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकरही उपस्थित होत्या. साळवी यांनी अजय चौधरी यांना विजयी करण्याचा शब्द दिला आहे. मी शिवसैनिक आहे शिवसैनिकांची कर्तव्य शंभर टक्के पूर्ण करणार आणि मशालचा आमदार मातोश्रीवर घेऊन येणार अशा पद्धतीचा शब्द त्यांनी उध्दव ठाकरे यांना दिलेला आहे, असे वचन साळवी दिल्याचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. शिवडीतून साळवी इच्छुक होते. आमदारकी मिळाली पाहिजे, असे स्वप्न पाहणे किंवा इच्छा व्यक्त करणे चूक नाही, असेही ते म्हणाले.
सुधीर साळवींनी आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त करणारे हे फलक लालबागमध्ये झळकवले. अनेकांनी ते स्टेटस म्हणून लावले. शुक्रवारी साळवींचा हा मेळावा सुरू होण्यापूर्वीच त्यांना मातोश्रीवर बोलावले गेले आणि हे बंड शमले. लालबागमध्ये लागलेले हे फलकही नंतर काढले गेले. या प्रकाराने ठाकरेंच्या शिव- सेनेचे गटनेते अजय चौधरी विरुद्ध मनसेचे बाळा नांदगावकर या लढतीची रंगत मात्र वाढली आहे.