

मुंबई : Maharashtra Assembly Polls | माहिम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलगा अमित ठाकरेंसाठी निवडणूकीचा 'राज मार्ग' मोकळा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रविवारी खलबते झाली. मात्र, शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी सोमवारी, लोकाचे प्रेम आणि जनतेच्या साथीने आपण विजयाच्या वाटेवर असल्याचे सुतोवाच 'एक्स' वर करत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होण्यासाठी उमेदवारी अर्ज भरायला चला, अशी सादही त्यांनी विभागातील शिवसैनिकांना घातली आहे.
माहिम विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर, मनसेकडून अमित ठाकरे व ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून विभागप्रमुख महेश सावंत हे निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे हे प्रथमच निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विजयासाठी महायुतीने पाठिंबा द्यायला हवा, अशी भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली होती. त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची शिवतिर्थावर भेट घेतल्यानंतर सरवणकर हे निवडणूकीतून माघार घेणार असल्याच्या चर्चेला पेव फुटले. सरवणकर यांनी माघार घेऊ नये यासाठी विभागातील शिवसैनिकांनी दादर येथील शाखेसमोर येऊन सरवणकर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. सरवणकर यांनी माघार घेऊ नये, असा आग्रह त्यांनी धरला. त्याचवेळी शिवसैनिकांना आश्वस्त करताना सरवणकर यांनी आपल्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी एबी फॉर्म दिला असून त्यांनी निवडणूक लढण्याचा सल्ला दिला असल्याचे सांगितले.
दरम्यान, अमित ठाकरे यांचा निवडणूकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा अशी मनसेचा आग्रह आहे. तर सरवणकर यांनी माघार घेतल्यास त्याचा फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला होईल, असे शिंदेंच्या शिवसेनेचे म्हणणे आहे. या चर्चेनंतर सरवणकर यांनी निवडणूक लढण्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. सरवणकर यांनी सोमवारी सकाळी आपल्या अधिकृत 'एक्स' या समाजमाध्यमावर मी उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे. चला होऊया ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार, असे आवाहन केले असून लोकांचे प्रेम आणि जनतेच्या साथीने विजयाच्या वाटेवर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला असलेल्या माहिम मतदारसंघात आता तिरंगी लढत अटळ आहे.