

राधानगरी : सामान्य जनतेच्या हितासाठी 'एक नोट एक व्होट 'चा नारा देत जनतेची फसवणूक करत विकासाच्या नावाखाली वैयक्तिक संपत्तीचा डोंगर उभा करणाऱ्या आ. प्रकाश आबिटकर यांना आता खड्यासारखे बाजूला करा, असा घणाघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के. पो. पाटील यांनी केला. ते राधानगरी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
संजय गोजारे यांनी स्वागत केले. शिक्षण समितीचे माजी सभापती जगदीश लिंग्रज यांनी प्रास्ताविक केले. के. पी. पाटील म्हणाले, सामान्य जनतेसाठी काम करण्याचा दावा करणारे आमदार आता जनतेच्या प्रश्नाला उत्तर देण्यास असमर्थ आहेत. टक्केवारीच्या मागे गुंतलेल्यांना जनतेच्या विकासाशी देणेघेणे नसल्याचे त्यांच्या निकृष्ट कामावरून सिद्ध झाले आहे. राधानगरीच्या समृद्ध परंपरेला लागलेला गद्दारीचा कलंक पुसण्यासाठी सर्वांनी सज्ज राहून क्रांतीची मशाल निवडूया.
राधानगरीचे माजी उपसरपंच अरविंद पवार म्हणाले, २००५ ते २०१४ या काळात के. पी. पाटील यांनी विकासकामांची दर्जेदार घोडदौड सुरू ठेवली होती; परंतु २०१४ नंतर या दर्जेदार कामाला वैयक्तिक लाभाची नजर लागली.
यावेळी भिकाजी किल्लेदार, राजेंद्रदादा पाटील, फत्तेसिंह भोसले, राजेंद्र भाटळे, राजू म्हापसेकर, विनय पाटील, फिरोजखान पाटील, संजय मुरगुडे, डी. एस. कांबळे, अनंत गुरव, प्रकाश कोगेकर, डॉ. बाजीराव खांडेकर, मोहन नेवडे, आनंदराव धनवडे, उमेश राणे, अनंत गुरव, आनंदराव पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब कळमकर यांनी आभार मानले.
राधानगरीत युवकांच्या हाताला काम मिळेल असा गेल्या १० वर्षांत कोणताही प्रकल्प उभारला गेला नाही. के. पी. पाटील यांनी या मतदारसंघात सूतगिरणी प्रकल्प उभा करून रोजगाराचे स्रोत निर्माण केले आहे. भविष्यकाळात मतदारसंघात के. पी. पाटील हेच एखाद्या प्रकल्पाची उभारणी करू शकतील, असे प्रा. के. बी. चौगले म्हणाले.