छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. यासाठी आता व्यापारी महासंघ, कॅट संघटनेही पुढाकार घेतला आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी व कामगारांनी आधी मतदान करावे आणि त्यानंतरच आपली प्रतिष्ठाने उघडावी. असे आवाहन करण्यात आले आहे. ही संख्या सुमारे तीन लाखांवर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर शहरात लहान-मोठे सुमारे एक लाख व्यापारी आहेत. तर त्यांच्याकडील कामगारांची संख्याही जवळपास तेवढीच आहे. जिल्ह्याचा विचार करताना ही संख्या सुमारे तीन लाखांवर आहे. जास्तीत जास्त मतदान होणे हे लोकशाहीसाठी पोषक असते. त्यामुळे मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबर रोजी व्यापारी, व्यावसायिकांनी आणि त्यांच्याकडील कामगारांनी सकाळीच मतदानाचा हक्का बजावून घ्यावा. त्यानंतरच दुकाने सुरू करावीत, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघ आणि कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले आहे. यावर महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, वरिष्ठ उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी, कॅटचे जिल्हाध्यक्ष संतोष कावले पाटील, सचिव पंकज लोया यांची नावे आहेत.
मतदान करून दुकाने उघडा मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील लहान-मोठे सर्वच व्यावसायिकांनी आपले व आपल्या कर्मचाऱ्यांचे मतदान केल्याशिवाय दुकान उघडू नये, जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सहकार्य करावे.
संजय कांकरिया, अध्यक्ष, व्यापारी महासंघ
व्यापारी, कामगारांनी मतदान करावे मतदान करणे हा आपला हक्क आणि कर्तव्यही आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याअ- ाधीच मतदान करावे, तसेच त्यांच्याकडील कामगारांकडूनही मतदान करून घ्यावे.
लक्ष्मीनारायण राठी, वरिष्ठ उपाध्यक्ष, व्यापारी महासंघ