

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. कैलास गोरंट्याल यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. प्रत्येक गावात मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला जात आहे.
जालना विधानसभा मतदार संघात असलेल्या एकूण ७२ गावांपैकी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी आतापर्यंत जवळपास ६० गावांना भेटी दिल्या असून त्यात प्रामुख्याने इंदेवाडी, अंतरवाला, कुंबेफळ, देवमूर्ती, वाचूळ जहागीर, जामवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्ण नगर, रामनगर, मौजपुरी, साळेगाव सावरगाव हडप, भिलपुरी, बाजीउम्नद तांडा, पाहेगाव तांडा, जैतापूर, धांडेगाव तांडा आदी गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावात डोअर टू डोअर प्रचार करत आ. कैलास गोरंट्याल यांनी थेट महिला, पुरुष आणि युवक मतदारांशी संवाद साधला. कॉर्नर सभा, गावातील पारांवर आयोजित व्यापक बैठकांच्या माध्यमातून गोरंट्याल यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा उपस्थित मतदारांसमोर मांडत भविष्यात जालना मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन ते मतदारांना करत आहेत.
विविध गावांत आयोजित सभांमधून जालना सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडून आ. गोरंट्याल हे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यावर टीकेची तोफ डागत आहेत. एकूणच मतदार संघातील या प्रचार दौऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास गोरंट्याल यांनी जोरदार मुसंडी मारली असून प्रत्येक गावात प्रतिसाद मिळाला आहे. ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत करून आ. गोरंट्याल यांना विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.