

नांदेड : भोकर मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून डझनभर इच्छुक असताना भाजपाच्या श्रीजया विरुद्ध 'पप्पू'ची लॉटरी लागल्याने माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर गेली चार दिवस रुसून बसल्याची माहिती समोर आली तर एकीकडे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या काँग्रेसच्या इच्छुक दामिनी ढगे यांना काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्याने दादाराव ढगेही बंडाच्या पावित्र्यात दिसून येत होते. दादाराव ढगे यांनी आपल्या समर्थकांची बैठकही मुदखेड येथे दणक्यात आयोजित करुन बंड करू असे संकेत पक्षाला दिले होते.
भोकर मतदारसंघातील सर्व हालचालींवर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून लक्ष असल्याने दादाराव ढगे बंड करतील का ? याबाबत लोकांत उत्सुकता होती. एकीकडे भोकर येथे ता २७, रविवार रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीश महाजन, खा. अशोक चव्हाण यांची उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेच्या भव्य मैदानावर सभा आयोजित केली होती.
त्याचवेळी सभेसाठी मोठा लवाजमा भोकरमध्ये दिसुन येत असताना दामिनी दादाराव ढगे यांच्याही बैठकीला समर्थकांची मोठी गर्दी दिसून आल्याने 'ढगे' काय निर्णय घेणार ? अशी चर्चा असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची दादाराव ढगे यांनी साकोली (जिल्हा भंडारा) येथे भेट घेतली. यानंतर भोकर मतदारसंघातील 'डगे'चे बंड शमल्याची चर्चा आहे. दरम्यान सकाळीच दादाराव ढगेंनी पप्पू पाटलांना घरी बोलावून अभिष्टचिंतन करीत दिलजमाई केल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे भोकर मतदारसंघात काँग्रेसकडून पहिल्याच यादीत तिकिटाच्या स्पर्धेत 'पप्पू' पास हो गया; असे चित्र स्पष्ट झाल्यावर माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर जुन्या काळातील नवरद वासारखे रुसून बसल्याची चर्चा होती. नायगावचे चव्हाण कुटुंबीय व पप्पू उर्फ तिरुपती कोंडेकर यांच्या चार तास मनधरणीनंतर बाळासाहेब रावणगावकर थोडेफार हसत उठले आणि मी पण 'पप्पू' सोबत आहे याची ग्वाही देत सामूहिक फोटो काढून समाज माध्यमातून व्हायरल करण्यात आला.