छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. परंतु कॉंग्रेसवाल्यांच्या दबावामुळे त्यांना संभाजीनगर नाव देता आले नाही. महायुतीची सत्ता येताच सर्वप्रथम संभाजीनगर नाव दिले. तुमची अन् बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा महायुतीने पूर्ण केली. मात्र औरंगाबादचे संभाजीनगर नाव झाल्याने सर्वाधिक त्रास काँग्रेसवाल्यांनाच झाल्याचे टीकास्त्र गुरुवारी (दि. १४) छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या विजय निर्धार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले. तसेच औरंगजेबचे कौतुक करणाऱ्यांना या निवडणुकीत जागा दाखविण्याचे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, महायुतीचे उमेदवार अतुल सावे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संतोष पाटील दानवे, अनुराधा चव्हाण, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरिष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, एजाज देशमुख यांची उपस्थिती होती. सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम मराठवाड्याच्या भूमीतील संतांना नमन केले. त्यानंतर कांग्रेसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ही निवडणूक राज्यात नवीन सरकार आणण्याची नाही, तर या निवडणुकीत एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांना मानणारा वर्ग आहे अन् दुसरीकडे औरंगजेबची स्तुती करणारे आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला हे माहिती आहे की, छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्याची मागणी ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. मात्र महाविकास आघाडीची अडीच वर्षे सत्ता असूनही केवळ काँग्रेसच्या दबावामुळे त्यांची नाव बदलण्याची हिम्मत झाली नाही. या उलट सत्ता येताच महायुतीने सर्वप्रथम संभाजीनगर केले. मात्र हे नामांतर होताच याविरोधात कॉंग्रेसवाले न्यायालयात गेले. त्यामुळे औरंगजेबचे कौतुक करणाऱ्यांना या निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी मतदारांना केले.
तसेच महाराष्ट्रातील जनता अशा लोकांची साथ देणार आहे का, असा सवाल त्यांनी मतदारांपुढे उपस्थित केला. तर देशाची शान वाढविण्यासाठी महायुतीला साथ द्या अन् संविधान मजबूत करा, असे आवाहन आपल्या नेहमीच्या शैलीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
भाजप महायुती सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास होत आहे. त्यामुळेच मागील अडीच वर्षांत देशातील सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रातच आली आहे. ७० हजार कोटींहून अधिकच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. त्यातील ४५ हजार कोर्टीचे उद्योग आले असून राज्यात सर्वात मोठे इंडस्ट्रियल पार्क उभे राहणार आहे. यातून रोजगाराच्या संधी वाढतील, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.