अमरावती, पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 8 मतदारसंघात एकूण 2708 मतदान केंद्रांवर बुधवारी(दि.20)शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत आठही मतदारसंघात 58.48% टक्के मतदान झाले. तर सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या मतदानाची अंतिम आकडेवारी 65.57 टक्के होती. जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट या आठही मतदारसंघातील 160 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. विशेष म्हणजे मेळघाटातील अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार अचलपूर मतदारसंघात 71.14 टक्के मतदान झाले. तर अमरावती मतदारसंघात सर्वात कमी 55.98 टक्के मतदान झाले. बडनेरा मतदारसंघात 57.57 टक्के मतदान झाले. दर्यापूर मतदार संघात 65.84 टक्के मतदान झाले. धामणगाव रेल्वे मतदार संघात 67.21 टक्के मतदान झाले.मोर्शी मतदारसंघ 71.30 टक्के तर मेळघाट मतदार संघात सर्वाधिक 72.70 टक्के मतदान झाले. तिवसा मतदार संघात 67.10 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील 160 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी नंतर होणार आहे.
बुधवारी सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळपासूनच उत्साह दिसून आला. मात्र, सायंकाळपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नव्हती. जिल्ह्यातील 25 लाख 46 हजार 458 मतदारांपैकी 58.48 टक्के मतदारांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. तर सहा वाजेपर्यंत ही आकडेवारी 65.57 टक्क्यावर पोहोचली. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.