

नाशिक : विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून, जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आचारसंहितेची काटेकाेर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच आचारसंहितेचा भंग होणाऱ्या ठिकाणी तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे जिल्हा नोडल अधिकारी राजेंद्र वाघ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने वाघ यांनी गुरुवारी (दि.१७) जिल्हाधिकारी कार्यालयात कक्षप्रमुख व नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
वाघ म्हणाले, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सर्वच राजकीय पक्षांनी नियमांचे पालन करावे. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांचा प्रचार, मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया ही योग्य आणि शांततेत पार पाडणे हा आचारसंहितेचा प्रमुख उद्देश आहे. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील १५ ही विधानसभा मतदारसंघांत आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. एखाद्या उमेदवाराने अथवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. तसेच गंभीर बाब असल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करताना प्रसंगी कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे, असा इशारा वाघ यांनी दिला. यावेळी आचारसंहितेबद्दल प्रत्येक घटकाने काय काळजी घ्यावी याबाबत बैठकीत अवगत करण्यात आले. बैठकीला पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, महानगरपालिका उपआयुक्त अजित निकत, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.