

नाशिक : जिल्ह्यातील १५ ही जागांवरील लढती या लक्षवेधी ठरणार आहेत. मैदान मारण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात १५ पैकी सहा मतदारसंघांत आजी - माजी आमदार आमनेसामने असून, त्यांच्यात ‘काँटे की टक्कर’ बघावयास मिळत आहे, तर येवला, नांदगाव, दिंडोरी, मालेगाव बाह्य या मतदारसंघांत होत असलेल्या ‘बिग फाइट’कडे राज्याचे लक्ष लागून आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत होत असली, तरी युती - आघाडींमधील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याचे मोठे दिव्य उमेदवारांना पार करावे लागत आहेत. विशेषत: आजी - माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मतदारसंघांमध्ये हा गोंधळ अधिक प्रमाणात बघावयास मिळत असून, शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना जो उमेदवार सोबत ठेवेल, त्याचा विजयाचा मार्ग प्रशस्त होईल, अशी काहीशी स्थिती बघावयास मिळत आहे. जिल्ह्यातील नाशिक मध्य, देवळाली, इगतपुरी, निफाड, देवळा - चांदवड, कळवण, नांदगाव या सहा मतदारसंघांमध्ये आजी - माजी आमदार आमनेसामने आहेत.
‘नाशिक मध्य’मध्ये आ. देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते यांच्यात जोरदार टसन बघावयास मिळत आहे. देवळालीमध्ये आ. सरोज अहिरे आणि माजी आमदार योगेश घोलप यांच्यात चुरशीच्या लढतीची शक्यता असतानाच, याठिकाणी युती धर्माला तडा गेल्याने, शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांचेही आव्हान आ. अहिरे यांच्यासमोर असणार आहे. इगतपुरीमध्ये आ. हिरामण खोसकर यांच्यासमोर दोन माजी आमदार मैदानात आहेत. ‘मनसे’कडून माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, तर अपक्ष म्हणून निर्मला गावित मैदानात असल्याने, खोसकर यांना विजयाचे गणित जुळविताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
निफाडमध्ये आ. दिलीप बनकर यांच्यासमोर शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार अनिल कदम असून, कळवणमध्ये आमदार नितीन पवार यांच्यासमोर माजी आमदार जे. पी. गावित यांनी आव्हान उभे केले आहे. बागलाणमध्येही आ. दिलीप बोरसे यांच्यासमोर माजी आमदार दीपिका चव्हाण मैदानात असल्याने याठिकाणी पारंपरिक सामना बघावयास मिळत आहे. तर देवळा - चांदवडमध्ये महायुतीचे आ. डॉ. राहुल आहेर यांच्यासमोर काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल मैदानात उतरले असले, तरी केदा आहेर यांनी भाजपकडून बंडखोरी केल्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ विरुद्ध शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांच्यातील लढत सर्वाधिक लक्षवेधी होण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आ. सुहास कांदेंविरुद्ध उबाठा गटाचे गणेश धात्रक अशा सरळ लढतीची शक्यता असतानाच, माजी खासदार समीर भुजबळ अपक्ष म्हणून मैदानात उतल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
मालेगाव बाह्य या मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरुद्ध शिवसेना उबाठा गटाचे डॉ. अद्वय हिरे मैदानात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात घडलेल्या घडामोडींमुळे येथील लढत लक्षवेधी ठरत आहे.
दिंडोरी मतदारसंघातही "काँटे की टक्कर' बघावयास मिळत आहे. येथे युतीधर्म पाळण्यावरून बरेच नाट्य रंगले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने धनराज महाले यांना हेलिकाॅप्टरने एबी फॉर्म पाठविला होता. नंतर त्यांनी माघार घेतली असली, तरी त्यांना सोबत घेऊन जाण्याचे मोठे आव्हान झिरवाळ यांच्यासमोर असणार आहे. या मतदारसंघात झिरवाळ विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुनीता चारोस्कर असा सामना होत आहे.
देवळा - चांदवड मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेल्या केदा आहेर यांना उमेदवारी मिळावी, म्हणून निवडणुकीतून माघार घेणाऱ्या आ. डॉ. राहुल आहेर यांनाच पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, ही खेळी असल्याचा आरोप करीत बंधू केदा आहेर अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याने सध्या या मतदारसंघात भावाभावांमध्येच टसन बघावयास मिळत आहे. याचा काँग्रेस उमेदवार माजी आमदार शिरीष कोतवाल यांना कितपत फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ विरुद्ध शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांच्यातील लढत सर्वाधिक लक्षवेधी होण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आ. सुहास कांदेंविरुद्ध उबाठा गटाचे गणेश धात्रक अशा सरळ लढतीची शक्यता असतानाच, माजी खासदार समीर भुजबळ अपक्ष म्हणून मैदानात उतल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे.