

सरवडे: पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे एक प्रबळ इच्छुक उमेदवार ए. वाय. पाटील यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देतो, असा शब्द देऊनसुध्दा आयत्यावेळी त्यांना डावलले. तर दुसरीकडे माजी आमदार के. पी. पाटील यांनी आज (दि. २३) शिवबंधन बांधले. त्यांना आजच राधानगरी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे ए.वाय.पाटील यांची कोंडी झाली आहे.
त्यामुळे पुढील राजकीय दिशा स्पष्ट करण्यासाठी ए.वाय यांनी गुरुवारी (दि. २४) सकाळी नऊ वाजता सोळांकूर (ता. राधानगरी) येथील व्यंकनाथ मंदिरात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. यावेळी ते आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करुन त्यांना निवडून आणण्यात ए. वाय. पाटील यांनी मोठी भूमिका घेतली होती. त्यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी ए, वाय. यांना उमेदवारी देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर मेळाव्यातून सांगितले होते. त्यानंतर ए. वाय. यांनी जनसंपर्क, जनसंवादाच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला होता. तसेच राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जवळपास १० जिल्हा परिषद मतदारसंघात मेळावे घेतले. त्यामुळे "बदल हवा, चेहरा नवा' ही टॅगलाईन घेऊन शिलेदार व कार्यकर्त्यांनी वातावरण निर्मिती केली होती.
त्यातच ३० वर्षानंतर गटाला उमेदवारी मिळणार, काँग्रेसच्या पाठबळावर ए. वाय यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी तिकीट डावलल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. अजून किती टर्म माघार घेऊन फक्त पाठिंबा द्यायचा व गटाला आमदारकीपासून वंचित ठेवायचे, अशा भावना व्यक्त होत आहेत.